esakal | राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा दिलासा 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

क्षीरसागर यांच्या विरोधातील तक्रारीकडे लक्ष 
मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने यांनी नागनाथ क्षीरसागर यांच्याकडील हिंदू खाटीकच्या जात प्रमाणपत्र बद्दल सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर एक सुनावणी झाली असून दुसरी सुनावणी दिवाळीनंतर होईल अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा दिलासा 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळ (जि. सोलापूर) विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार यशवंत माने यांच्याकडे असलेला हिंदू कैकाडी जातीचा दाखला बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मिळविला असल्याची तक्रार मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर यांनी केली होती. ही तक्रार बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निकाली काढली आहे. 

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (भटक्‍या जमाती), इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 नुसार व उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाड्यानुसार समितीला पुर्ननिर्णयाचे अधिकार प्राप्त नसल्याचे कारण देत समितीने क्षीरसागर यांची तक्रार निकाली काढली आहे. समितीमधील सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. समिती अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी जी. आर. खरात, समिती सदस्य तथा उपायुक्त राकेश पाटील, समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भा. उ. खरे यांनी 6 नोव्हेंबरला हा आदेश दिला आहे. हा निर्णय घेण्यासाठी 13 ऑक्‍टोंबरला समितीची बैठक झाली होती. 

आमदार माने यांच्या शेळगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) गावातील विलास देवराज भांगे यांनीही 2017 मध्ये आमदार यशवंत माने यांच्या जातीच्या दाखल्या संदर्भात बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळी समितीकडे तक्रार केली होती. या प्रकरणात देखील भांगे यांची तक्रार 11 सप्टेंबर 2018 ला समितीने फेटाळली होती. 31 ऑगस्टला क्षीरसागर यांनी बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या तक्रारी अर्जावर काहीच कार्यवाही होत नसल्याने क्षीरसागर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. आमदार यशवंत माने यांच्या तक्रारी बद्दल कार्यवाही करण्यासाठी बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला सूचना देण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली होती. उच्च न्यायालयाने 5 नोव्हेंबरला ही याचिका फेटाळली आहे.

loading image