esakal | जिल्ह्यातील 40844 पुरुषांना आतापर्यंत कोरोना; आज 682 पॉझिटिव्ह तर नऊजणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

1Sakal_20_2836_29_2.jpg

गर्दीत जाणे टाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हाताची स्वच्छता ठेवणे हेच ठोस उपाय असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील 40844 पुरुषांना आतापर्यंत कोरोना; आज 682 पॉझिटिव्ह तर नऊजणांचा मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरात आज 299 तर ग्रामीणमध्ये 383 रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी शहरातील चौघांचा तर ग्रामीणमधील पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यात शेळगाव (आर) येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात 66 हजार 260 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात 40 हजार 844 पुरुष तर 25 हजार 416 महिलांचा समावेश आहे.

ठळक बाबी...

  • शहर-जिल्ह्यातील 66 हजार 260 जणांना झाली आतापर्यंत कोरोनाची बाधा
  • शहरातील 767 तर ग्रामीणमधील एक हजार 261 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी
  • आतापर्यंत 40 हजार 844 पुरुषांना तर 25 हजार 416 महिलांना झाला कोरोना
  • एकूण रुग्णांपैकी 57 हजार 85 रुग्णांनी केली कोरोनावर मात; सध्या सात हजार 147 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • आज शहरातील 201 ठिकाणी तर ग्रामीणमधील बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपुरात आढळले सर्वाधिक रुग्ण

कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर अनेकांशी संपर्क येणे, त्यावेळी ओळखीचे असल्याने अथवा मित्र असल्याने सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे काटेकोर पालन न करता संपर्कात येण्यामुळे पुरुषांची बाधितांमध्ये संख्या सर्वाधिक राहिली आहे. तर पुरुषांच्या संपर्कातून अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे, नियमांचे उल्लंघन केल्याने महिलाही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गर्दीत जाणे टाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हाताची स्वच्छता ठेवणे हेच ठोस उपाय असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व पंढरपूर या तालुक्‍यात रुग्णांचा जोर वाढू लागला आहे. रुग्णांच्या तुलनेत मृत्यूही वाढत असल्याने चिंता वाढली आहे. दररोज शहर-जिल्ह्यातील सरासरी सात ते आठ हजार संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे. मागील काही दिवसांत ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून सध्या सात हजार 147 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. शहरातील 29 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दुसरीकडे शहरातील बहुतेक भागात रुग्ण सापडू लागले असून आज तब्बल 201 ठिकाणी 299 रुग्ण आढळले आहेत. विजयपूर रोड, होटगी रोड, नेहरू नगर, शेळगी, जुळे सोलापूर अशा भागातील रुग्णांचाही त्यात समावेश आहे.

तालुकानिहाय आजचे रुग्ण
अक्‍कलकोट (3), बार्शी (79), करमाळा (65), माढा (86), माळशिरस (65), मंगळवेढा (20), मोहोळ (22), उत्तर सोलापूर (12), पंढरपूर (97), सांगोला (25) आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात नऊ रूग्ण आज वाढले आहेत.