esakal | कोरोना : सोलापूर जिल्ह्यात नो सायकल, नो व्हेईकल 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बॅंकिंग, लॉजिंगला दिलासा 
सर्व हॉटेल/लॉजमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांना आरोग्यविषयक आवश्‍यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून देता येणार आहे. अन्नपदार्थांची उपहारगृहातून ऑनलाइन मागणीद्वारे पुरवठा करणारी यंत्रणा, बॅंकिंग सेवेची संलग्नित सर्व यंत्रणा, मोबाईल कंपनी संबंधित टॉवरचे काम सुरू राहणार आहे. ई-कॉमर्स अंतर्गत आवश्‍यक वस्तू अन्न, औषध वैद्यकीय उपकरणे, खासगी सुरक्षा सेवा यांना देखील संचारबंदी मधून वगळण्यात आले आहे. 

कोरोना : सोलापूर जिल्ह्यात नो सायकल, नो व्हेईकल 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज रात्री दहा वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) संचारबंदी लागू केली आहे. सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीसाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्वतंत्ररीत्या आदेश काढले आहेत. सर्व प्रकारचे उत्पादन, वस्तू निर्माण, उद्योग व बांधकाम विषयक तसेच इतर सर्व व्यवसाय बंद ठेवले जाणार आहेत. जिल्हा अंतर्गत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली सायकल तसेच पारंपरिक व अपारंपरिक इंधनावर चालणाऱ्या मोटरसायकल (गिअरसह व गिअर शिवाय) व सर्व प्रकारच्या वाहनांचा प्रवास व वाहतूक बंद राहणार आहे. 
हेही वाचा - मेगाभरती लांबणीवर : मुदतवाढीनंतर पाच कंपन्यांची नियुक्ती 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्याशी संलग्न असलेल्या सर्व आंतरराज्य सीमा व आंतरजिल्हा सीमा बंद केल्या जाणार आहेत. एका वेळी फक्त एका व्यक्तीस मुभा असणार आहे. सूट देण्यात आलेल्या आस्थापनेवरील व सेवा सेवेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. पेट्रोलपंप सुरू ठेवण्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 2 ही वेळ निश्‍चित करून देण्यात आली आहे. पेट्रोल भरण्यास येणाऱ्या ग्राहकांमध्ये तीन फुटांपेक्षा अधिक अंतर ठेवावे लागणार आहे. संचारबंदी आदेशातून शासकीय व निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना तसेच नागरी सेवा सुविधा पुरविणाऱ्या यंत्रणा, शासनाचे स्वस्त धान्य दुकाने, अन्नधान्य व अन्नधान्यावरील प्रक्रिया, पुरवठा करणारे उद्योग तसेच आवश्‍यक किराणा सामान, दूध, दुग्ध उत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय, जीवनावश्‍यक वस्तू वाहतूक, विक्री, वितरण, तातडीची रुग्ण वाहतूक सेवा तसेच सर्व प्रकारचे वैद्यकीय (ऍलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी) नर्सिंग कॉलेज, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाना, हॉस्पिटल सेवेतील डॉक्‍टर, नर्सेस व सेवारत कर्मचारी, औषधी उत्पादन व विक्री तसेच शस्त्रक्रिया संबंधित सर्व आवश्‍यक सामग्रीचे उत्पादन करणारे निर्माते घरपोच करणारी यंत्रणा यांना वगळण्यात आले आहेत. 
हेही वाचा - संजयमामा शिंदे देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक महिन्याचे वेतन 
या शिवाय खते बी-बियाणे कीटकनाशक पशुखाद्य, कृषीविषयक सेवा कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी बनविण्यात येणारे मास्क तयार करणारी आस्थापना, प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टीव्ही न्यूज चॅनल) कार्यालय चालू राहतील. प्रसारमाध्यमांचे कर्तव्यावर असणारे अधिकृत प्रतिनिधी व कार्यालयीन कर्मचारी, एलपीजी गॅस एजन्सी व त्यांची गोडाऊन व त्यासंबंधी वाहतूक करणारी यंत्रणा, आंतरराज्य सीमा भागातून व आंतरजिल्हा सीमेवरून अत्यावश्‍यक सेवेसाठी होणारी वाहतूक (उदा. अन्नधान्य, फळे, किराणा, दूध, मांस, औषधे) संचारबंदीच्या आदेशातून वगळण्यात आली आहे.