esakal | आता रिक्षाचालकांना दर पंधरा दिवसांनी कोरोना टेस्ट बंधनकारक !
sakal

बोलून बातमी शोधा

Rikshwa

आता रिक्षाचालकांना दर पंधरा दिवसांनी कोरोना टेस्ट बंधनकारक !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी असल्याने शहरात अत्यावश्‍यक सेवेसाठी अनेक रिक्षा फिरत आहेत. शहरात 15 हजारांहून अधिक रिक्षा आहेत. त्या रिक्षाचालकांनी दर 15 दिवसांनी कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. रिक्षा वाहतूक करताना त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र असावे, अशा सूचना सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांनी दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील 25 रिक्षाचालकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.

संचारबंदीच्या आदेशानंतर शहरातील हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दोन पथके नियुक्‍त करण्यात आली आहेत. शहरात पेट्रोलिंग व नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. 17) महावीर चौक या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, निखिल पवार व गुन्हे शाखेकडील कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालकांनी कोरोना टेस्ट केली आहे की नाही, याची खात्री केली. ज्यांनी कोरोना टेस्ट केलेली नाही, अशांची टेस्ट करण्यात आली. महापालिकेचे डॉ. झैद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून एकूण 25 रिक्षाचालकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांनी दिली. शुक्रवारी (ता. 16) रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. उद्या (रविवारी) दुसऱ्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून शहरात फिरणाऱ्या रिक्षाचालकांची टेस्ट केली जाणार आहे. 1 मे पर्यंत ही मोहीम सुरुच राहील, असेही डोंगरे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

रिक्षाचालकांसाठी तीन निकष...

  • कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र रिक्षाचालकांनी जवळ ठेवणे बंधनकारक

  • दर 15 दिवसांनी त्यांनी करून घ्यावी कोरोनाची रॅपिड अँटीजेन टेस्ट

  • प्रत्येक खेपेनंतर रिक्षा सॅनिटायझ करून घ्यावी; चालकासह प्रवाशांना मास्कचे बंधन

  • चालक आणि प्रवाशांमध्ये रिक्षात असावे प्लॅस्टिक कापडाचे पार्टिशन

  • दंडात्मक कारवाईपेक्षा सामाजिक बांधिलकी

पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर, डॉ. दिपाली धाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रिक्षाचालकांवर अशा परिस्थितीत दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांची कोरोना टेस्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रवाशांची वाहतूक करताना रिक्षाचालकांसह त्यांचे कुटूंब सुरक्षित राहावे या हेतूने त्यांची दररोज कोरोना टेस्ट करून त्यांना जागेवरच प्रमाणपत्र दिले जात आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, हा त्यामागचा हेतू असल्याचे अभय डोंगरे यांनी सांगितले.