esakal | Coronavirus : दिल्लीतील कार्यक्रमाचे बार्शी कनेक्‍शन
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus Barshi connection to the event in delhi

संपर्कात आलेल्यांची महिती घेणे सुरू 
पिंपरी येथील सात जणांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना सोलापूर येथे हलवण्यात आले असून उद्यापर्यंत त्यांचा रिपोर्ट येण्याची शक्‍यता आहे. हे व्यक्ती कोणाकोणाला भेटले, त्यांचा संपर्क कोणाशी आला आहे का, या संदर्भात पोलिस चौकशी करीत आहेत. याची माहिती घेण्याचे काम चालू आहे. 
- डॉ. सिद्धेश्‍वर भोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, बार्शी 

Coronavirus : दिल्लीतील कार्यक्रमाचे बार्शी कनेक्‍शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बार्शी (जि. सोलापूर) : दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन भागात असलेल्या तबलिगे जमात या धार्मिक संस्थेने आयोजित केलेल्या इस्तेमाच्या कार्यक्रमास बार्शी शहरातून सहाजण तर तालुक्‍यातील पिंपरी (आर) येथून आठजण जाऊन आले आहेत. पोलिस व बार्शीच्या आरोग्य विभागाने त्यांना मध्यरात्री ताब्यात घेऊन तपासणीसाठी सोलापूर येथे वर्ग केले असून त्या 14 जणांना निगराणीखाली ठेवले आहे. 

बार्शी शहर व तालुक्‍यात पुणे, मुंबईसह इतर शहरांतून आलेल्यांची संख्या सुमारे 20 हजारांपेक्षा जास्त असून शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक पोलिस व आरोग्य यंत्रणा यांना यांची माहिती देत आहेत. बाहेरून आलेले हे नागरिक स्वतःची कोणतीही तपासणी करीत नाहीत. त्यामुळे शेजारी राहणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग त्या व्यक्तीस झाला असेल तर आपल्याला होईल, अशी भीती वाटत आहे. पिंपरी (आर) येथील एका नागरिकाने दिल्ली येथून इस्तेमाचा कार्यक्रम आटोपून आलेल्या आठ जणांची माहिती पोलिसांना व ग्रामसेवकास फोन करून देताच वैराग पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मंगळवारी मध्यरात्री सर्वांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात वर्ग केले आहे. या घटनेची माहिती बार्शी शहर पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहायक पोलिस निरीक्षक बबन येडगे यांनी बार्शीतील दिल्लीला इस्तेमाच्या कार्यक्रमास जाऊन आलेले किती नागरिक आहेत याची माहिती घेतली. 
शहरातील वेगवेगळया भागात राहणारे हे सहा जण दिल्ली येथील कार्यक्रमास उपस्थित राहून बार्शीला परतले होते, अशी माहिती समोर आली. त्या सर्वांना आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन तपासणीसाठी सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले आहे. 

संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू 
या 14 जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शहर व तालुक्‍यातील पोलिसांनी या 14 जणांच्या संपर्कात आलेला मित्रपरिवार, शेजारी, कुटुंबीयांची चौकशी सुरू केली असून त्यांना स्वतःची काळजी घेण्याचे तसेच त्रास जाणवला तर त्वरित संपर्क करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असून संबंधित लोकांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकाचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. 

माहिती दिल्याने वृद्ध व कुटुंबीयास मारहाण 
दिल्लीतील तबलीकी इस्तेमाच्या झालेल्या कार्यक्रमात बार्शी तालुक्‍यातील पिंपरी (आर) येथील सात लोक सहभागी झाले होते. या लोकांची माहिती स्थानिक ग्रामसेवकाला दिल्यामुळे एका वृद्धाला व कुटुंबीयास मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. 31) दुपारी घडली आहे. बहादूर साहेबलाल पठाण (वय 68), असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत बहादूर पठाण यांच्या फिर्यादीवरून वैराग पोलिस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
या घटनेची वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपरी (आर) येथील सातजण दिल्लीतील मेळाव्यात गेले होते. मेळाव्यास गेलेल्या त्या लोकांची तपासणी झाली आहे का? अशी विचारणा फिर्यादी बहादूर साहेबलाल पठाण यांनी ग्रामसेवक नितीन वाघमारे यांच्याकडे केली होती. त्यावरून ग्रामसेवकाने त्या लोकांना वैद्यकीय तपासणीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यावेळी तुम्हाला हे कोणी सांगितले, असे विचारले असता ग्रामसेवकाने फिर्यादीचे नाव सांगितले. मंगळवारी फिर्यादी दुपारी एकच्या दरम्यान घरासमोर थांबला असताना गावातील दिल्ली मेळाव्यास गेलेल्या लोकांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन वैद्यकीय तपासणी संदर्भात ग्रामसेवकाकडे केलेल्या चौकशीचा राग मनात धरून बहादूर साहेबलाल पठाण, त्यांची पत्नी चॉंदबी बहादूर पठाण, मुलगा बिलाल बहादूर पठाण, मुलगी तब्बू व नसरीन यांना शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. बहादूर पठाण यांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिली असून तपास पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत.