esakal | गटविकास अधिकाऱ्याची माणुसकी ! स्वत: सरण रचून केला कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार

बोलून बातमी शोधा

Corona

गटविकास अधिकाऱ्याची माणुसकी ! स्वत: सरण रचून केला कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यापासून पळ काढल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, बार्शीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी स्वतः कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सरण रचत त्यांना अग्नी देऊन माणुसकी जपली आहे. ही घटना वैराग येथील आहे. यावरून शेखर सावंत यांनी शासकीय जबाबदारी बरोबरच सामाजिक भानही जपल्याचे दिसून येत आहे.

रूपा इंद्रजित राऊत (वय 60, रा. पिंपरी (सा), ता. बार्शी) यांना श्वसनाचा व इतर त्रास सुरू झाल्याने त्यांचा मुलगा दिनेश राऊत व मनोज राऊत यांनी वैराग येथील संतनाथ डेडिकेटेड सेंटरमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. उपचार करूनही त्यांची प्रकृती मात्र खालावतच गेली. अखेर त्यांना अधिकचा त्रास सुरू झाल्याने शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. अचानकपणे मायेची सावली निघून गेल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा: pandharpur Elections 2021: पाचव्या फेरीअखेर भगीरथ भालके आघाडीवर

नियमाप्रमाणे कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला नाही. यानंतर वैराग ग्रामपंचायतीच्या वतीने पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. या वेळी कुटुंबीय उपस्थित होते मात्र त्यांना लांब अंतरावर थांबवण्यात आले होते.

या वेळी खुद्द गटविकास अधिकारी शेखर सावंत आणि ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मृत रूपा राऊत यांचा मृतदेह कोव्हिड सेंटरमधून स्मशानभूमीपर्यंत आणून स्वतःच्या हाताने सरण रचूत भडाग्नी दिला. ग्रामपंचायत कर्मचारी अण्णासाहेब जगताप, स्वप्नील चौधरी, बाळासाहेब पांढरमिसे, पांडुरंग चव्हाण, प्रसाद भेंडे, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या सहकार्याने हा अंत्यविधी करण्यात आला. शासकीय अधिकारी यांनी धाडसीपणाने स्वतःच्या हाताने अंत्यविधी करत प्रशासकीय यंत्रणा खंबीरपणे उभी असल्याचे दाखवून दिले आहे. शासकीय अधिकारी यांनी कोरोना महामारीच्या काळात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.