डंख कोरोनाचा : दवाखान्यात चालत गेलेल्या क्रेन ऑपरेटरचा सहाव्या दिवशी मृत्यू, भाऊजी गेले, बहिणीसाठी भाऊ धावून आले  

corona
corona

सोलापूर : भाऊजींना सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागला. अशक्तपणाही आला म्हणून त्यांच्या मेहुण्यांनी त्यांना दुचाकीवरुन सोलापुरातील नामांकित रुग्णालयात आणले. दवाखान्यात चालत गेलेल्या 36 वर्षाच्या विवाहित, धडधाकड तरुणाच्या मृतदेहाचेच दर्शन घेण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आली. स्वप्नातही विचार न केलेली एवढी वाईट वेळ कोरोनामुळे प्रत्यक्षात आली. उपचारासाठी वेळेत दवाखान्यात येऊन देखील अवघ्या सहाव्या दिवसांमध्ये होत्याचे नव्हते झाले. कोरोनाच्या भीतीने घरात राहून देखील संभाजी शेंडगे यांच्या हसत्या-खेळत्या परिवाराला कोरोनाचा डंख बसलाच. 

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने केलेल्या लॉकडाउनची झळ जशी सर्वांना बसत आहे. तशीच झळ क्रेन ऑपरेटर असलेल्या संभाजी शेंडगे यांना आणि त्यांच्या परिवारालाही बसली. कर्नाटकातील इंडी तालुक्‍यात गाव असलेल्या संभाजी शेंडगे हे गेल्या 13 वर्षांपासून सोलापुरातील निलमनगरमध्ये स्थायिक झाले होते. लॉकडाउनमुळे क्रेनचा व्यवसाय ठप्प झाल्याने ते घरीच होते. संभाजी यांना मेच्या शेवटच्या आठवड्यात सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला, अशक्तपणाही जाणवू लागला. कोरोनाच्या काळात अंगावर दुखणे काढायला नको म्हणून ते वेळीच दवाखान्यातही गेले.

संभाजी यांचे मेहुणे विनोद गायकवाड आणि अजिंक्‍य गायकवाड (रा. कोंडी, सध्या सोलापुरात वास्तव्य) यांनी त्यांना दुचाकीवरुन 30 मे रोजी सोलापुरातील रुग्णालयात आणले. हसत खेळत असलेले भाऊजी, फारसा कोणताही त्रास नसलेले भाऊजी आठ-दहा दिवसात बरे होऊन येतील अशीच सर्वांना अपेक्षा होती. कोरोनाचा डंख इतका खोलवर असेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला आली नव्हती. अवघ्या सहा दिवसात होत्याचे नव्हते झाले आणि संभाजी यांची प्राणज्योत 5 जूनला मावली.

13 वर्षांपूर्वी विवाह झालेल्या बहिणीच्या संसारावर कोरोनाने केलेला आघात गायकवाड कुटुंबियांसाठी खूपच वेदनादायी आहे. नामांकित दवाखान्याने अवघ्या सहा दिवसांमध्ये संभाजी यांच्या औषधाचा खर्च दवाखान्याचे बिल तब्बल लाख रुपयांचे केले. पैशासारखा पैसा गेला आणि माणूस गमवावा लागला. मित्र आणि नातेवाईकांकडून उसनवारी करून विनोद अणि अजिंक्‍य यांनी दवाखान्याचा खर्च भागविला. एवढे करूनही भाऊजी गेल्याचे दु:ख मात्र आयुष्यभरासाठी सोबत राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com