esakal | पंढरपूर पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? साखर सम्राट की तिसराच !
sakal

बोलून बातमी शोधा

Bhalke_Avtade

पंढरपूर पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? साखर सम्राट की तिसराच !

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : प्रचारातील मातब्बरांच्या सहभागामुळे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चांगलीच रंगत भरली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. थकीत एफआरपीप्रकरणी चालू हंगामात कारवाई झालेल्या संत दामाजी व श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष या निवडणुकीत आमने-सामने आहेत. या दोघांपैकी कोणता साखर सम्राट आमदार होणार? की तिसराच बाजी मारणार? याचा फैसला पंढरपूर- मंगळवेढ्यातील मतदार उद्या (17 एप्रिल) करणार आहेत.

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र व श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके तर त्यांच्या विरोधात भाजपतर्फे संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांनी प्रचारात राळ उडवून दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवार सचिन शिंदे यांच्यासाठी कंबर कसली आहे. अपक्ष शैला गोडसे यांनी "एकला चलोरे' म्हणत प्रचारात रंगत आणली. सिद्धेश्वर आवताडे देखील अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावून बघत आहेत. भगीरथ भालके यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी समाधान आवताडे यांच्यासाठी जोर लावला आहे.

या निवडणुकीत एकूण 19 उमेदवार असले तरी भगीरथ भालके व समाधान आवताडे यांच्यातच प्रमुख लढत असल्याचे मानले जात आहे. भगीरथ भालके हे श्री विठ्ठल सहकारी तर समाधान आवताडे हे संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही कारखान्यांवर यंदाच्या गळीत हंगामात थकीत एफआरपी संदर्भात साखर आयुक्तालयाकडून आरआरसीनुसार (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई झाली आहे.

प्रचारात आला एफआरपीचा मुद्दा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या दोन्ही कारखान्यांकडे असलेल्या एफआरपीच्या थकबाकीचा मुद्दा प्रचारात उपस्थित केला होता. शैला गोडसे यांनीही दोन्ही कारखान्यांच्या स्थितीबद्दल संबंधित उमेदवारांनाच जाब विचारण्याचे आवाहन केले होते. थकीत एफआरपीचा मुद्दा निवडणुकीत कितपत प्रभावी ठरतो, ते 2 मे रोजीच स्पष्ट होणार आहे. सचिन शिंदे, शैला गोडसे व सिद्धेश्वर आवताडे किती व कोणाची मते घेतात, यावरच भालके व आवताडे यांचे यश-अपयशाचे गणित अवलंबून राहणार, हे उघड आहे.