esakal | मंगळवेढा आठवडी बाजारात शुकशुकाट ! सलग चार दिवस बॅंका बंदमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Mangalwedha

कोरोनाच्या संकटाबरोबर लॉकडाउनची चर्चा व सलग चार दिवस बॅंका बंदचा परिणाम मंगळवेढ्याच्या आठवडा बाजारावर दिसून आला. ग्राहक न आल्याने नाशवंत पदार्थ व भाजीपाला कमी दर लावून विक्री करावी लागली. अपेक्षित ग्राहक न आल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

मंगळवेढा आठवडी बाजारात शुकशुकाट ! सलग चार दिवस बॅंका बंदमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाच्या संकटाबरोबर लॉकडाउनची चर्चा व सलग चार दिवस बॅंका बंदचा परिणाम मंगळवेढ्याच्या आठवडा बाजारावर दिसून आला. ग्राहक न आल्याने नाशवंत पदार्थ व भाजीपाला कमी दर लावून विक्री करावी लागली. अपेक्षित ग्राहक न आल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

कोरोना संकटाचा प्रादुर्भाव राज्यात सुरू झाल्यामुळे प्रशासनाने नियम कडक करण्याचे प्रयत्न सुरू केले असतानाच, पोलिसांकडून मास्क नसणाऱ्यांवर कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. शहरांमध्ये पालकमंत्र्यांच्या आढावा भेट दौऱ्याच्या वेळी मास्क नसलेले नागरिक आज मास्क लावल्याने दिसू लागले. आठवडा बाजार असल्यामुळे मंगळवेढ्याबरोबर सांगोला, मोहोळ, पंढरपूर, चडचण, जतच्या पूर्व भागातील व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी मंगळवेढा येथे येत असतात आणि मालाच्या खरेदीसाठी मंगळवेढा शहराबरोबर ग्रामीण भागातील नागरिक देखील खरेदीसाठी येत असतात. 

परंतु, शनिवार व रविवारच्या सुट्यांबरोबर सोमवारपासून राष्ट्रीयकृत बॅंकांनी खासगीकरण व इतर मागणीसाठी संप पुकारल्यामुळे शहरात असलेल्या बॅंक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बॅंकांचे व्यवहार थांबल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. याशिवाय या बॅंकांनी ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून आपले व्यवहार चालू ठेवत बॅंकेतील गर्दी कमी केली असली तरी प्रत्यक्षात त्या ग्राहक सेवा केंद्रावर देखील पैशाचा तुटवडा झाल्याने बहुतांश ग्राहक सेवा केंद्रे देखील बंद होती. एटीएममध्ये तर शुक्रवारपासूनच खडखडाट दिसून आल्यामुळे आठवडा बाजाराच्या निमित्ताने मजुरी करणाऱ्या मजुरांचे पगार देणे देखील अडचणीचे ठरल्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. 

व्यवसायाच्या माध्यमातून मुद्रा कर्ज घेऊन व्यवसाय थाटला; मात्र वर्षभरापासून कोरोनाच्या संकटातही ग्राहकांची संख्या रोडावल्यामुळे घेतलेले कर्ज देखील फिटेनासे झाले. शासनाने सर्वांना सवलती दिल्या, परंतु व्यवसायासाठी मुद्रा कर्ज घेतलेल्या छोट्या व्यावसायिकांना मात्र अजून आधार दिलेला नाही. 
- दत्तात्रय मोरे, 
कापड विक्रेता 

खातेदारांची गैरसोय आणि बॅंकेत गर्दी होऊ नये म्हणून गावोगावी नेमलेल्या बॅंक मित्रामुळे सोय झाली. कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्‍यात घालून खातेदारांना पैसे उपलब्ध करून दिले. मात्र बॅंक मित्रांच्या भविष्याकडे बॅंकेने व शासनाने दुर्लक्ष केले. 
- अमोल जाधव, 
बॅंक मित्र 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image