esakal | दहावी-बारावी परीक्षेची दैनंदिन माहिती आता ऑनलाइन 
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी-बारावी परीक्षेची दैनंदिन माहिती आता ऑनलाइन 
  • राज्यभरातील उपस्थिती समजणार 
  • कॉपी केसेस, भरारी पथकाची माहिती एका क्‍लिकवर 
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा चांगला निर्णय 
  • सायंकाळी सातपर्यंत माहिती ऑनलाइन भरण्याच्या सूचना 

दहावी-बारावी परीक्षेची दैनंदिन माहिती आता ऑनलाइन 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेपासून दररोज होणाऱ्या कॉपी केसेस, विद्यार्थ्यांची उपस्थिती, भरारी पथके यासारखी माहिती ऑनलाइन भरण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेची दैनंदिन स्थिती आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. 

हेही वाचा ः रेल्वे प्रवाशांसाठी! झेलम, गोवा एक्‍स्प्रेस रद्द 

दररोज होणाऱ्या पेपरची ऑनलाइन माहिती भरण्याची जबाबदारी त्या-त्या केंद्र संचालकांकडे देण्यात आली आहे. पहिल्या सत्रात होणाऱ्या पेपरची माहिती दुपारी एक ते तीन तर दुसऱ्या सत्रातील सायंकाळी पाच ते सात या वेळेत भरण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत. प्रत्येक पेपरला उपस्थित व अनुपस्थित मुलांची माहिती ऑनलाइन भरायची आहे. त्याचबरोबर प्रत्येक पेपरला किती कॉपी केस झाल्या, भरारी पथकाची कामगिरी, बैठे पथकाची कामगिरी, त्यांनी किती वर्गाला भेट दिली, भरारी पथकाने किती केंद्रांना भेट दिली, प्रश्‍नपत्रिका सहायक परीरक्षकाची माहिती मंडळाला ऑनलाइन द्यावी लागणार आहे. 

हेही वाचा ः लग्नपत्रिका चक्क स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीच्या फॉरमॅटमध्ये! 

त्यामुळे राज्यातील एखाद्या केंद्रातील स्थितीची माहिती मंडळाला एका ठिकाणी बसून ऑनलाइन मिळणार आहे. यातून परीक्षेच्या प्रत्येक घटनेकडे मंडळाचे लक्ष असेल. केंद्र संचालकांनी केंद्राचा ऑनलाइन अहवाल विभागीय मंडळांना सादर केल्यानंतर त्यांनी त्याची पडताळणी करावी. सगळ्या केंद्राच्या अहवालाचे संकलन करून तो ऑनलाइन मंडळाकडे सादर करावा. मंडळाचा निर्णय चांगला असून परीक्षा केंद्रातील दैनंदिन हालचालींची माहिती सायंकाळी सात वाजेपर्यंत मंडळाकडे प्राप्त होणार आहे. त्यातून परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. 

केंद्र संचालकांनी नोंदणी करणे गरजेचे 
10वी-12वी परीक्षेसाठी निश्‍चित केलेल्या केंद्र संचालकांनी दैनंदिन माहिती ऑनलाइन सादर करण्यासाठी आवश्‍यक असलेली नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी केंद्र संचालकांनी एकदाच करायची आहे. दैनंदिन माहिती भरण्यासाठी केंद्र लॉगिनला जाऊन दैनंदिन माहिती त्यांनी भरायची आहे. मंडळाने नव्याने सुरू केलेली पद्धत जरी चांगली असली तरी केंद्रचालकांच्या कामात थोडासा बदल होणार आहे. पूर्वी कागदोपत्री जमा करायची माहिती आता संगणक किंवा मोबाईलच्या सहायाने ऑनलाइन भरायची आहे. 

 
 

loading image