esakal | भाविकांनो, अक्कलकोटला येऊ नका ! वाढत्या कोरोना संसर्गामुळे स्वामी समर्थांचे दर्शन पुन्हा बंद

बोलून बातमी शोधा

Swami

कोरोना संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने मंदिरात गर्दी होऊ नये याकरिता सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मंदिर समितीस प्राप्त झाल्यानंतर 5 एप्रिल रोजी रात्री आठ ते 30 एप्रिलअखेर रात्री 12 वाजेपर्यंत वटवृक्ष मंदिर भाविकांच्या दर्शनाकरिता बंद ठेवण्यात आले आहे.

भाविकांनो, अक्कलकोटला येऊ नका ! वाढत्या कोरोना संसर्गामुळे स्वामी समर्थांचे दर्शन पुन्हा बंद
sakal_logo
By
चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे मंदिर सोमवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा बंद करण्यात आले. कोरोना संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने मंदिरात गर्दी होऊ नये याकरिता सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मंदिर समितीस प्राप्त झाल्यानंतर 5 एप्रिल रोजी रात्री आठ ते 30 एप्रिलअखेर रात्री 12 वाजेपर्यंत वटवृक्ष मंदिर भाविकांच्या दर्शनाकरिता बंद ठेवण्याबाबत मंदिर समितीच्या वतीने निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. 

दरम्यान, मंदिरातील नियमित धार्मिक विधी, पूजा, आरती आदी धार्मिक उपक्रम नियमित पार पडणार असून भाविकांना पूर्णपणे दर्शन बंद करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बुधवार 14 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांचा प्रकटदिन असून, सालाबादप्रमाणे प्रकट दिनानिमित्त होणारे धार्मिक उपक्रम हे मंदिरातच समितीचे पुजारी व विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. कोणत्याही भाविकांचा त्यात सहभाग राहणार नाही. 

वटवृक्ष मंदिरात रोज स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. यामध्ये मुंबई, पुण्यासह नगर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आदी भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. त्याचप्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यासह शेजारील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तसेच देश- विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मंदिर समितीने वटवृक्ष मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी पुढील आदेश येईपर्यंत भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला येण्याचे टाळावे व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच राहून स्वामी समर्थांची आराधना करावी, असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. 

संपाद : श्रीनिवास दुध्याल