'लक्ष्मी'च्या ठेवीदारांना फेब्रुवारीत मिळणार ठेव रक्‍कम! आजपासून भरा अर्ज | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lakshmi bank
'लक्ष्मी'च्या ठेवीदारांना फेब्रुवारीत मिळणार ठेव रक्‍कम! आजपासून भरा अर्ज

'लक्ष्मी'च्या ठेवीदारांना फेब्रुवारीत मिळणार ठेव रक्‍कम!

सोलापूर : विनातारणी कर्जदारांनी त्यांच्याकडील देणी थकविल्याने अडचणीत आलेल्या लक्ष्मी बॅंकेत (The Lakshmi Co-Operative Bank) 94 हजार 14 ठेवीदारांचे 223 कोटी रुपये अडकले आहेत. परंतु, ठेवी विमा व पत विमा महामंडळाकडून बॅंकेतील ठेवीदारांना पाच लाख रुपये मिळणार आहेत. 45 दिवसांत ठेवीदारांचे अर्ज महामंडळाला पाठविले जाणार असून तिथून पुढील 45 दिवसांत पैसे मिळणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया आज (सोमवारी) सुरू होणार असून 5 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत राहील, अशी माहिती बॅंकेवरील प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष नागनाथ कंजेरी यांनी दिली.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांना 150 कोटी वाढीव वेतन! संप मिटवण्यासाठी तीन पर्याय

लक्ष्मी बॅंकेच्या साखरपेठ शाखेत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अमर झालटे, बॅंकेचे सल्लागार दिलीप सुकोळी, बॅंकेचे अधिकारी सुहास कुलकर्णी उपस्थित होते. लक्ष्मी बॅंकेची स्थिती अन्‌ गतीबद्दल प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष कंजेरी यांनी माहिती दिली. बॅंकेचे 105 कोटींचे कर्ज थकले असून थकीत कर्जासाठी बॅंकेने जवळपास 65 कोटींची प्रोव्हिजन केल्यानेच बॅंक अडचणीत आली. परंतु, ठेवीदारांच्या रकमेवर बॅंकेने विमा संरक्षित रक्‍कम विमा महामंडळाकडे भरल्याने त्या सर्व ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतची ठेव परत मिळणार आहे. पाच लाखांपेक्षा कमी ठेव असलेल्यांची संपूर्ण रक्‍कम तर पाच लाखांपेक्षा अधिक ठेव असलेल्यांना तूर्तास पाच लाख रुपयेच मिळणार आहेत. विमा महामंडळाकडे पुढील 45 दिवसांत प्रस्ताव पाठविला जाणार असून त्यानंतर पुढील 45 दिवसांत म्हणजेच साधारणपणे फेब्रुवारी 2022 मध्ये ही रक्‍कम मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. मुदतीत सर्व ठेवीदारांनी बॅंकेत अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. रविवारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना अर्ज भरण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले.

ठळक बाबी...

  • 27 डिसेंबरपूर्वी विमा महामंडळाकडे पाठविले जातील ठेवीदारांचे प्रस्ताव

  • बॅंकेच्या ई-मेलवरही अर्ज भरण्याची सोय; वेगवेगळ्या बॅंकेत ठेवी असतील, तरीही एकाच ठिकाणी भरावा अर्ज

  • 22 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत बॅंकेच्या मुख्य शाखेसह 17 शाखांमध्ये सुट्टी दिवशीही अर्ज भरण्याची सोय

  • मयत ठेवीदाराच्या वारसाला भरता येईल अर्ज; अर्जासोबत मृत्यू दाखल्याचे बंधन

  • 22 डिसेंबरपासून 90 दिवसांत विमा महामंडळाकडून ठेवीदारांना मिळेल पाच लाखांची रक्‍कम

हेही वाचा: 'स्वामीभक्तांच्या सोयीसाठी 'कनेक्‍टिव्हिटी'ची गरज'

थकबाकी वसुलीनंतरच पाच लाखांवरील रक्‍कम

लक्ष्मी बॅंकेच्या शहरात 13 तर ग्रामीणमध्ये अक्‍कलकोट, बार्शी, पंढरपूर व नातेपुते या ठिकाणी शाखा आहेत. बॅंकेत एकूण 94 हजार 14 ठेवीदारांच्या ठेवी आहेत. त्यात पाच लाखांहून अधिक ठेव असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे. विमा महामंडळाकडून पाच लाखांपर्यंतचीच रक्‍कम मिळणार असून त्यावरील रक्‍कम थकबाकीदारांकडील कर्ज वसूल झाल्यानंतरच पुढील रक्‍कम मिळेल, असे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष नागनाथ कंजेरी यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top