लक्ष्मी बॅंकेच्या 'या' ठेवीदारांनाही मिळणार ठेव रक्‍कम | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lakshmi bank
लक्ष्मी बॅंकेच्या 'या' ठेवीदारांनाही मिळणार ठेव रक्‍कम !

लक्ष्मी बॅंकेच्या 'या' ठेवीदारांनाही मिळणार ठेव रक्‍कम !

सोलापूर : लक्ष्मी बॅंकेच्या (The Lakshmi Co-operative Bank) 94 हजार 14 ठेवीदारांची ठेव बॅंकेत अडकली आहे. त्यांना विमा महामंडळाकडून (Insurance Corporation) प्रत्येकी पाच लाख रुपयांचे विमा संरक्षित रक्‍कम मिळणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्यास सोमवारी (ता. 22) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी तीन हजार 524 ठेवीदारांनी अर्ज भरून दिले.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला 'ब्रेक'! संपामुळे 315 कोटींचा फटका

थकबाकीदारांकडील कर्जाची रक्‍कम वसूल होत नसल्याने लक्ष्मी बॅंकेला नफ्यातून एनपीएची तरतूद करावी लागली. त्यामुळे अडचणीत आलेल्या बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने आता प्रशासकीय मंडळाची नियुक्‍ती केली आहे. सहा महिन्यांसाठी नियुक्‍त केलेल्या या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी तर सदस्य म्हणून दक्षिण सोलापूरचे सहायक निबंधक अमर झालटे यांची नियुक्‍ती केली आहे.

त्यांनी आता सर्वप्रथम ठेवीदारांना प्रत्येकी पाच लाखांची रक्‍कम विमा महामंडळाकडून मिळवून देण्यासाठी नियोजन केले आहे. 45 दिवसांत प्रस्ताव पाठवून पुढील 45 दिवसांत ठेवीदारांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने 5 डिसेंबरपर्यंत ठेवीदारांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत, अशी माहिती कंजेरी यांनी दिली. बॅंकेच्या ठेवीदारांना रक्‍कम मिळाल्यानंतर बॅंकेच्या 105 कोटींची थकबाकी वसुलीचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून कर्जाची रक्‍कम वसूल केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: 'सिद्धेश्‍वर कारखान्या'च्या चिमणीचे गुरुवारी काय होणार?

ठेवींची फोड झालेल्यांनाही प्रत्येकी पाच लाख

थकबाकीदारांमुळे लक्ष्मी बॅंक अडचणीत सापडल्याचे समजल्यानंतर अनेक ठेवीदारांनी बॅंकेत धाव घेतली. ठेवी काढून घेण्यावर खातेदारांचा भर होता. परंतु, बॅंकेत पैसे नसल्याने त्यांना पैसे मिळालेच नाहीत. परंतु, बॅंक अधिकाऱ्यांनी त्यांना सोपा मार्ग दाखविला आणि पाच लाखांवरील ठेवीदारांच्या रकमेत फोड करून त्यांच्या कुटुंबातील व्यक्‍तींच्या नावे उर्वरित रक्‍कम ट्रान्सफर करण्यात आली. बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने प्रशासक नियुक्‍त करण्यापूर्वी ही कार्यवाही झाल्याने संबंधितांना आता प्रत्येक खात्यावरील पाच लाखांची ठेव रक्‍कम मिळणार आहे. त्यासाठी बॅंकेने सप्टेंबर 2020 मध्येच विमा उरवून ठेवला होता.

loading image
go to top