esakal | उपमुख्यमंत्र्यांनी दिली मंगळवेढ्यातील बसवेश्‍वर स्मारकास मान्यता ! आता मिळणार पर्यटन विकासास चालना
sakal

बोलून बातमी शोधा

Basaveshwar Smarak

शहराच्या पर्यटनात वाढ होण्यासह गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी आवश्‍यक तितक्‍या निधीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. यामुळे मंगळवेढ्यातील नागरिकांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक होत आहे. 

उपमुख्यमंत्र्यांनी दिली मंगळवेढ्यातील बसवेश्‍वर स्मारकास मान्यता ! आता मिळणार पर्यटन विकासास चालना

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : शहराच्या पर्यटनात वाढ होण्यासह गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी आवश्‍यक तितक्‍या निधीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. यामुळे मंगळवेढ्यातील नागरिकांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक होत आहे. 

मंगळवेढा शहरालगत महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी बसवप्रेमी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मागील सरकारच्या काळात याबाबत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती निश्‍चित करण्यात आली. या समितीने कृषी खात्याची 35 एकर जागा निश्‍चित करून 100 फुटांची मूर्ती, स्मारक परिसरामध्ये ग्रंथालय, ध्यान केंद्र, अभ्यास केंद्र, स्मारक, कृषी पर्यटन स्थळ, भक्त निवास, शेतकरी निवास, बसवेश्वरांची माहिती देणारे फलक आधी निश्‍चित करण्यात आले. 

या समितीने 151 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर केला. विधानसभेत तत्कालीन आमदार दिवंगत भारत भालके यांनी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला. स्मारकावरून अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांच्यावर आरोप देखील केले. परंतु मागील सरकारच्या काळात स्मारकाची देखभाल - दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणी घ्यायची, यावरून हा प्रस्ताव परत आला. नगरपालिकेने पत्र दिले. परंतु जागा ही नगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याने याबाबतची जबाबदारी कृषी खात्याकडे दिली असल्याचे समजते. 

महाविकास आघाडी सरकारने महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केल्यामुळे भविष्यकाळात या मार्गावरून ये - जा करणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी पर्यटन संधी उपलब्ध होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण स्मारकाबाबतची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांच्याकडून घेतली. त्या वेळीच निधीची तरतूद होण्याचे संकेत मिळाले. लवरकरच स्मारकास सुरवात होणार आहे. 
- अजित जगताप, 
सदस्य, नियोजन मंडळ 

स्व. भारत भालके यांनी महात्मा बसवेश्वर व संत चोखोबा स्मारकासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने आज बसवेश्वर स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. चोखोबांच्या स्मारकाबरोबर अंतिम टप्प्यात असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील. स्व. नानांच्या प्रयत्नाला यश येईपर्यंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. 
- भगीरथ भालके, 
अध्यक्ष, विठ्ठल साखर कारखाना 

स्व आमदार भारत भालके यांच्या प्रयत्नाला यश आले, पण हे यश पाहायला ते असायला हवे होते, अशी खंत मनात असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंगळवेढ्यावर लक्ष देत प्रलंबित प्रश्नाला न्याय दिल्याने लिंगायत बांधवांतून आनंद व्यक्त होत आहे. स्मारकाचे काम झाल्यावर या परिसरात पर्यटनाला संधी उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या वतीने सहकार्य करण्यास तयार आहे. 
- अरुणा माळी, 
नगराध्यक्षा, मंगळवेढा 

युती सरकारच्या काळात बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न रेंगाळला होता, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आनंद झाला असून, दोन महिन्यांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन दिले होते. त्या दोघांनी स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला. 
- शैला गोडसे, 
शिवसेना नेत्या 

संपादन : श्रीनिवास दुध्याल