esakal | Women's day 2021 : मुलींनो, पोलिस अधिकारी व्हायचंय? मग वाचा पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे व त्यांच्या माहीची यशकथा
sakal

बोलून बातमी शोधा

Deepali Dhaate

आई पोलिस अधिकारी आणि वडील उदगीर येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. कामाच्या व्यापात आई- वडिलांना पुरेसा वेळ देता येत नसतानाही "माही'ने आई डॉ. दीपाली धाटे- घाडगे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयएएसच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. 

Women's day 2021 : मुलींनो, पोलिस अधिकारी व्हायचंय? मग वाचा पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे व त्यांच्या माहीची यशकथा

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : आई पोलिस अधिकारी आणि वडील उदगीर येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. कामाच्या व्यापात आई- वडिलांना पुरेसा वेळ देता येत नसतानाही "माही'ने आई डॉ. दीपाली धाटे- घाडगे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयएएसच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. माहीने दहावीत औरंगाबाद येथील नाथव्हॅली प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. 98.98 टक्‍के गुण घेत माहीने नावलौकिक मिळवला. 

डॉ. दीपाली यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील केज. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावात घेऊन डॉ. दीपाली यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबेजोगाई गाठले. दोन वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएससाठी प्रवेश मिळाला. दरम्यान, त्यांचे वडील एका नामवंत कॉलेजचे प्राचार्य तर आई तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झाल्या. कुटुंबात तीन मुली आणि एक मुलगा असतानाही आई- वडिलांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही कमरता भासू दिली नाही. तर डॉ. दीपाली यांच्या भावाने त्यांना स्पर्धा परीक्षेचे स्वप्न दाखवले. 

डॉ. दीपाली यांचा विवाह 2000 मध्ये झाला आणि 2003 मध्ये माहीचा जन्म झाला. त्याच काळात डॉ. दीपाली या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होत्या. त्या वेळी त्यांच्या सासू उच्चशिक्षित नसतानाही सर्वांचा विरोध डावलून त्यांनी मोठा आधार दिला. 2004 मध्ये परीक्षा दिली आणि डॉ. दीपाली यांनी अधिकारी होण्याच्या स्वप्नाला गवसणी घातली. त्यानंतर नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सहाय्यक पोलिस आयुक्‍त म्हणून पोस्टिंग मिळाली. तिथून त्यांनी औरंगाबाद, लातूर, पुणे येथे सहाय्यक पोलिस आयुक्‍त म्हणून काम पाहिले. प्रमोशनवर त्या उस्मानाबाद येथे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक झाल्या. औरंगाबाद शहरात पोलिस उपायुक्‍त म्हणून काम करतानाच त्यांची आता सोलापूर शहरात पोलिस उपायुक्‍त म्हणून बदली झाली. माहीने आईचा आदर्श घेऊन त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. 

जिद्द, चिकाटी, परिश्रम करीत दहावीत मोठे यश 
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना माही एक-दीड वर्षांची होती. त्यानंतर मला "एमपीएससी' परीक्षेत यश मिळाले आणि ड्यूटीनिमित्त विविध जिल्ह्यांचा प्रवास करावा लागला. तरीही माहीने जिद्द, चिकाटी, परिश्रम करीत दहावीत मोठे यश मिळविले. ती एक मोठी अधिकारी व्हावी आणि तिला लोकसेवेची संधी मिळावी म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. 
- डॉ. दीपाली धाटे-घाडगे, 
पोलिस उपायुक्‍त, सोलापूर 

ठळक बाबी... 

  • माहीने दहावीत मिळविले 98.98 टक्‍के गुण 
  • फूटबॉलमध्ये माही आहे गुड स्वीमर 
  • बारावीत असतानाच माहीने सुरू केली स्पर्धा परीक्षेची तयारी 
  • माहीला व्हायचे आहे आईसारखेच अधिकारी; स्वप्नपूर्तीसाठी आईचा सपोर्ट 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image