esakal | प्रतिकूल परिस्थितीतही बहरली बरबडे यांची आंब्याची बाग ! स्वतः पिकवून स्वतःच करताहेत मार्केटिंग

बोलून बातमी शोधा

Mango

जेऊर परिसरात सतत पाऊस कमी तसेच दुष्काळसदृश स्थिती असते. अशावेळी श्री. बरबडे यांच्या 18 एकर शेतीपैकी सात एकर क्षेत्रावर लावलेली 1800 केशर जातीची तर हापूस, आम्रपाली, तोतापुरी, रत्ना, पायरी तसेच लालबाग आदी प्रकारची 200 अशी दोन हजार आंब्याची रोपे बहरली आहेत. 

प्रतिकूल परिस्थितीतही बहरली बरबडे यांची आंब्याची बाग ! स्वतः पिकवून स्वतःच करताहेत मार्केटिंग
sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : कृषिनिष्ठ शेतकरी तथा 33 वर्षे कृषी खात्यातून निवृत्त झालेले विजयकुमार बरबडे (जेऊर, ता. अक्कलकोट) यांनी प्रतिकूल परिस्थिती तसेच निसर्गाची अवकृपा यावर मात करीत आंब्याची शेती बहरवली आहे. ते आंबे पिकवून थांबत नाहीत, तर विक्री यंत्रणा स्वतः राबवितात आणि त्यातून मिळणारे उत्पन्नदेखील वाढवितात. यामुळे ग्राहकांना दर्जेदार व नैसर्गिकरीत्या पिकविलेले आंबे वाजवी दरात उपलब्ध होतात आणि गरज नसताना मध्यस्थांची नफेखोर यंत्रणा पद्धत आपोआप नाहीशी होते. 

जेऊर परिसरात सतत पाऊस कमी तसेच दुष्काळसदृश स्थिती असते. अशावेळी श्री. बरबडे यांच्या 18 एकर शेतीपैकी सात एकर क्षेत्रावर लावलेली 1800 केशर जातीची तर हापूस, आम्रपाली, तोतापुरी, रत्ना, पायरी तसेच लालबाग आदी प्रकारची 200 अशी दोन हजार आंब्याची रोपे बहरली आहेत. यामुळे ग्राहकांना नैसर्गीकरीत्या पिकविलेल्या आंब्याची चव चाखता येणार आहे. सर्वांना निर्भेळ आंबे आणि वाजवी दरात मिळावेत असा श्री. बरबडे यांचा प्रमुख उद्देश असतो. 

स्वतः कृषी पदव्युत्तर पदवी घेतलेली असल्याने ते वर्षभर झाडांची निगा राखतात, जोपासना करतात. त्यांनी आंब्याला चांगला बहार यावा यासाठी सुपारी आकाराचे आंबे असताना विरळणी केली. त्यांना पुरेसे गांडूळ खत वापरले. त्यातच यावर्षी या परिसरात धुवॉंधार पाऊस झाल्याने उत्पादन चांगले आणि दर्जेदार मिळणार आहे. एकूण अठरा एकर क्षेत्रापैकी सात एकरवर ड्रीपचा वापर करून आंब्याची झाडे वाढविली आहेत. यातून पंधरा ते वीस टन आंब्यांचे उत्पादन होऊ शकते, असा श्री. बरबडे यांचा अंदाज आहे. यावर्षी नवीन बागेतूनही चार हजारांपर्यंत आंब्याचे उत्पादन होऊ शकते. 

अक्कलकोट परिसरात उन्हाची तीव्रता जानेवारी - फेब्रुवारीपासूनच जाणवण्यास सुरवात होते. अशावेळी आंब्याला "सनबर्न'चा त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून जुनी साडी किंवा वृत्तपत्रांचे आच्छादन केले जाते. त्यामुळे डागरहीत फळ मिळते व नुकसान टळते, असा श्री. बरबडे यांचा अनुभव आहे. तसेच त्यांनी स्वतःचा ब्रॅंड विकसित केला आहे. ग्रेडिंग, पॅकिंग करून ते बॉक्‍सद्वारे विक्री करतात. आंब्याची गुणवत्ता अत्यंत चांगली, आकार एकसमान तसेच प्रत्येकी 250 ते 300 ग्रॅम वजनाचे फळ व अत्यंत चविष्ट अशा वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांकडून आंब्यास मागणी असते. अडीच किलोच्या बॉक्‍समध्ये सुमारे 10 ते 12 आंबे बसतात. ग्राहकांच्या मागणीनुसार पॅकिंग करण्यात येते. 

गुणवत्तापूर्ण व रुचकर तसेच नैसर्गिकरीत्या पिकविलेले दर्जेदार आंबे देणे हा आपला उद्देश आहे. येत्या काळात ज्या वेळी सर्व दोन हजार झाडेही उत्पादित होऊन मोठ्या प्रमाणावर आंबे सोलापूरवासीयांना मिळतील, त्या वेळी कष्टाचे चीज होईल. आणि यासाठी आपले निरंतर प्रयत्न सुरू आहेत. 
- विजयकुमार बरबडे, 
आंबा उत्पादक, जेऊर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल