esakal | बीपी, शुगर, लिव्हर, किडनीचा त्रास ! तरीही ऐंशी वर्षांच्या गुरुजींनी शिकवला कोरोनाला धडा

बोलून बातमी शोधा

Corona

बीपी, शुगर, लिव्हर, किडनीचा त्रास ! तरीही ऐंशी वर्षांच्या गुरुजींनी शिकवला कोरोनाला धडा

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील पिंपरी (सा) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बिभीषण बाबूराव काटमोरे (वय 80) यांनी प्रगल्भ इच्छाशक्तीच्या जोरावर नऊ दिवसांत कोरोनावर यशस्वी मात केली. विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानाचे धडे देणाऱ्या गुरुजींनी नऊ दिवसांत कोरोनालाच धडा शिकवून समाजात कोरोनाबाबत असलेली अवास्तव भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

बिभीषण काटमोरे व त्यांचा मुलगा ऍड. पद्माकर काटमोरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे दोघांनाही वैराग येथील संतनाथ कोव्हिड डेडिकेटेड हेल्थ सेंटर (हॉस्पिटल) येथे दाखल करण्यात आले होते. बिभीषण काटमोरे यांचा एचआरसीटीचा स्कोअर बारा, वीस वर्षांपासून बीपीचा आजार, पाच वर्षांपासून शुगरचा आजार, लिव्हरचा त्रास, सोलापूर येथे यशोधरा हॉस्पिटलमध्ये किडनीवर झालेली शस्त्रक्रिया अशा बिकट स्थितीत देखील गुरुजींनी आत्मविश्वासाच्या जोरावर विना रेमडेसिव्हीर व ऑक्‍सिजनशिवाय कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा: सख्ख्या भावांसह तिघांना आजन्म कारावास ! टमटमच्या भाड्यातून केला खून

या कठीण काळात शेजारच्या बेडवर उपचार घेत असलेला मुलगा ऍड. पद्माकर काटमोरे यास धीर देण्यास ते विसरले नाहीत. ऍड. पद्माकर काटमोरे हे बार्शी वकील संघाचे सदस्य असून, बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर सध्या वैराग येथे उपचार सुरू आहेत. बिभीषण काटमोरे यांनी 35 वर्षे शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहे. त्यांनी कुटुंबप्रमुख, शिक्षक व शेतकरी म्हणून उत्तम प्रकारे भूमिका पार पाडत परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बिभीषण काटमोरे म्हणाले, कोरोना आजारावर वेळीच उपचार घेतले तर हा आजार इतर आजारांप्रमाणे आहे. मानसिक सुदृढता, प्रगल्भ इच्छाशक्ती व सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीच्या आधारे आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो. या कठीण काळात संतनाथ कोव्हिड डेडिकेटेड हेल्थ सेंटर, कुटुंबीय व पिंपरी ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.