esakal | सख्ख्या भावांसह तिघांना आजन्म कारावास ! टमटमच्या भाड्यातून केला खून

बोलून बातमी शोधा

Crime
सख्ख्या भावांसह तिघांना आजन्म कारावास ! टमटमच्या भाड्यातून केला खून
sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : टमटमच्या भाड्याच्या वादातून एकाचा खून केला आणि अन्य काही जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बावीस्कर यांनी दोघा सख्ख्या भावांसह तिघांना आजन्म कारावास आणि एक लाख वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दादा दिगंबर लेंडवे, मधुकर दिगंबर लेंडवे आणि महादेव बाबा मोरे (रा. लेंडवे चिंचोळे, ता. मंगळवेढा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्याची हकिकत अशी की, 3 जून 2012 रोजी पांडुरंग भुसे याने त्याच्या टमटममधून दादा लेंडवे यांची म्हैस विकण्यासाठी सांगोला येथील बाजारात नेली होती. त्याच्या तीनशे रुपये भाड्याची मागणी दादा लेंडवे यांच्याकडे केली असता त्यांनी दोनशे रुपये दिले. राहिलेल्या शंभर रुपयांची मागणी केल्यावर देत नाही, असे म्हणून थोबाडीत मारली.

हेही वाचा: सोलापूरला "बाप'च नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध ! हेवेदावे विसरून आतातरी सर्वपक्षीय नेते एकत्र येतील का?

या प्रकाराबाबत पांडुरंग भुसे याने त्याचा मामा जनार्दन लेंडवे यास सांगितले. तेव्हा गावातील चार लोक बोलवून वाद मिटवू असे ठरले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी 4 जून 2012 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास लेंडवे चिंचोळे येथे आरोपी दादा दिगंबर लेंडवे, मधुकर दिगंबर लेंडवे, महादेव बाबा मोरे आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक असे मोटारसायकलवरून आले. जास्त भाडे पाहिजे का, त्यासाठी चारचौघात विचारतो का, असे म्हणून दादा लेंडवे याने चाकूने, महादेव लेंडवे याने कोयत्याने तर मधुकर लेंडवे याने दगडाने तानाजी लेंडवे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अंकुश तुळशीराम लेंडवे, धर्मराज गेना लेंडवे व आचिंद्र गेना लेंडवे हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेले असता आरोपी दादा लेंडवे आणि महादेव मोरे यांनी सुऱ्याने आणि कोयत्याने अंकुश लेंडवे याच्यावर वार केले. सर्व आरोपींनी धर्मराज गेना लेंडवे, आचिंद्र लेंडवे, तानाजी लेंडवे यांना देखील सुरा, कोयता आणि दगडाने मारहाण करून जबर जखमी केले.

जखमींना नातेवाइकांनी उपचारासाठी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता अंकुशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर अन्य जखमींना सोलापूर आणि सांगोला येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी नवनाथ तुळशीराम लेंडवे यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक सुहास भोसले यांनी तपास करुन आरोपींच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बावीस्कर यांच्यापुढे झाली. सरकार पक्षातर्फे सोळा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. या अनुषंगाने सरकार पक्षाने दाखल केलेले सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायनिवाडे, साक्षीदारांच्या साक्षी, सरकार पक्षाचा पुरावा, पंचनामे, आरोपींच्या एकंदर उलट तपासातील बाबी यांचे अवलोकन करून न्यायाधीश श्री. बावीस्कर यांनी आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी प्रत्येकी 25 हजार रुपये नवनाथ लेंडवे आणि धर्मराज लेंडवे यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असाही आदेश देण्यात आला आहे. या खटल्यात सरकारतर्फे सारंग वांगीकर, आनंद कुर्डुकर व एस. एस. दुलंगे यांनी काम पाहिले.