esakal | देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये राबवणार पंढरपूर-मंगळवेढा पॅटर्न !
sakal

बोलून बातमी शोधा

Fadnavis

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये राबवणार पंढरपूर-मंगळवेढा पॅटर्न !

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur- Mangalvedha Assembly by-election) भाजपने तिरंगी निवडणूक टाळून जो यशस्वी पॅटर्न राबवला, तो आगामी काळातील निवडणुकीत अनेक ठिकाणी राबवणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नूतन आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) आणि आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या वतीने मुंबई येथे ऋणनिर्देश सन्मान करण्यात आला, त्या वेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis said that Pandharpur-Mangalvedha pattern will be implemented in the upcoming elections)

हेही वाचा: सोलापूरच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन अन्‌ रस्त्यावरच्या लढाईचा निर्धार !

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत फडणवीस यांनी लक्ष घालून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला होता. मतांची विभागणी होऊ नये यासाठी आमदार समाधान आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांना त्यांनी एकत्र आणले. त्यामुळे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. या विजयानंतर नूतन आमदार समाधान आवताडे यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार डोंगरे, जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासमवेत मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी फडणवीस यांनी सर्व नेतेमंडळींच्या कामाचे कौतुक केले. पंढरपूर- मंगळवेढ्यातील विजयाचा पॅटर्न आगामी काळातील सर्व निवडणुकीत राबविणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा: जिल्ह्यातील कोव्हिड सेंटर्सची होणार आता अचानक तपासणी !

कोरोनाचा वाढता संसर्ग, मंगळवेढ्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न, उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा सरकारचा निर्णय याबाबत चर्चा झाली. आमदार आवताडे आणि आमदार परिचारक यांनी पंढरपूर- मंगळवेढ्यातील कोरोना रुग्णांच्या अडचणींकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले. उपचार करणाऱ्या काही डॉक्‍टर मंडळींनी, पंढरपूर- मंगळवेढ्यातील कोरोना रुग्णांवर औषधोपचाराचा प्रभाव तुलनेने कमी होत आहे. या भागात कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला असल्याचे काही डॉक्‍टरांचे मत असल्याविषयी सांगितले. त्याची दखल घेऊन फडणवीस यांनी तत्काळ सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्‍यक सूचना दिल्या.