esakal | अक्कलकोट पोलिसांसमोर आव्हान ! सलग दोन दिवस पेट्रोल पंपावर हजारो लिटर डिझेलची चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Disel Theft

अक्कलकोट पोलिसांसमोर आव्हान ! सलग दोन दिवस पेट्रोल पंपावर हजारो लिटर डिझेलची चोरी

sakal_logo
By
चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट - वागदरी रोडवरील मल्लिकार्जुन पेट्रोलपंप येथे अंडर ग्राउंड डिझेल टाकीतून 1420 लिटर डिझेलची (किंमत 1 लाख 22 हजार 980 रुपये) पाईपच्या सहाय्याने अज्ञात चोरट्याने चोरी केली. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की अक्कलकोट शहरातील एएस मंगरुळे पेट्रोलपंप व वागदरी रोड येथील मल्लिकार्जुन पेट्रोल पंप असे दोन पंप आनंद सिद्रामप्पा मंगरुळे चालवतात. गेल्या अठरा वर्षांपासून दोन्ही पंपांवर मनोज आनंदराव शिंदे हे मॅनेजर म्हणून काम करतात. सोमवारी (ता. 26) अक्कलकोट शहरातील पेट्रोल पंपावर कामावर असताना मालकांनी मॅनेजरला कळवले, की वागदरी रोड येथील मल्लिकार्जुन पेट्रोल पंपातील डिझेलची चोरी झाली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन खात्री करून मीटर रीडिंगने चेक केले असता डिझेलच्या टाकीत तफावत दिसून आली.

हेही वाचा: उपचारासाठी विलंब नकोच ! 30 वर्षांखालील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू; आज वाढले 1547 रुग्ण

रात्री पेट्रोलपंप बंद करण्यापूर्वी टाकीत 1770 लिटर डिझेल होते. पण सकाळी पाहिल्यानंतर टाकीत 350 लिटर डिझेल होते.1420 लिटर डिझेल टाकीत कमी असल्याचे दिसून आले. त्यानंतर तफावत कशामुळे झाली याची पाहणी केली. त्यानंतर खात्री झाली, की कोणीतरी अज्ञात इसमाने पेट्रोल पंपामधील अंडरग्राउंड डिझेल टाकीत पाईप टाकून कशाच्या तरी साह्याने ओढून घेऊन डिझेलची चोरी केली आहे. याबाबत पंप मॅनेजर मनोज आनंदराव शिंदे यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश भावीकट्टी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नाळे, पोलिस हवालदार विपीन सुरवसे, हवालदार अंगद गीते यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास हवालदार राजेंद्र फुलारी हे करीत आहेत.

शनिवारी (ता. 24) मध्यरात्री वागदरी येथील शाब्दी पेट्रोल पंपमधील 1500 लिटर डिझेलची धाडसी चोरी झाली. ही घटना ताजी असताना रविवारी (ता. 25) मध्यरात्री अक्कलकोट - वागदरी रोडवरील मल्लिकार्जुन पेट्रोल पंपावरील 1420 लिटर डिझेल चोरीला गेले. सलग दोन दिवसांत दोन पेट्रोल पंपांवरील डिझेलच्या चोरीने खळबळ उडाली असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

loading image