esakal | उपचारासाठी विलंब नकोच ! 30 वर्षांखालील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू; आज वाढले 1547 रुग्ण

बोलून बातमी शोधा

Corona

उपचारासाठी विलंब नकोच ! 30 वर्षांखालील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू; आज वाढले 1547 रुग्ण

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कडक संचारबंदीनंतर (14 एप्रिल) ग्रामीण भागात 13 हजार 952 रुग्ण वाढले असून, शहरात चार हजार 35 रुग्ण वाढले आहेत. शहर- जिल्ह्यातील 438 रुग्णांचा मागील 13 दिवसांत मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) शहरात 217 रुग्ण आढळले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात एक हजार 320 रुग्ण वाढले असून 20 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांमध्ये पेनूर येथील 35 वर्षीय तरुणाचा, बिटले (ता. मोहोळ) येथील 21 वर्षीय तरुणाचा, गावडी दारफळ येथील 28 वर्षीय तरुणाचा आणि बीबी दारफळ येथील 40 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. शहरातील आसरा सोसायटीतील 29 वर्षीय तरुणाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहर- जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 92 हजार 402 झाली असून त्यातील दोन हजार 621 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 31, करमाळ्यात 123, माढ्यात 147, मंगळवेढ्यात 147, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 53 तर सांगोल्यात 48 रुग्ण वाढले आहेत. तर बार्शीत 101 रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच माळशिरस तालुक्‍यात 245 रुग्ण वाढले असून आज एकाचा मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्‍यात 100 तर पंढरपूर तालुक्‍यात 299 रुग्ण वाढले असून दोन्ही तालुक्‍यांतील प्रत्येकी सहा रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यात 27 रुग्ण आढळले असून चारजणांचा मृत्यू झाला आहे. लक्षणे असतानाही कोरोना टेस्ट करून न घेणे, उपचारासाठी दवाखान्यात जाण्यास विलंब करणाऱ्यांचा मृतांमध्ये सर्वाधिक समावेश आहे. अनेक रुग्ण मागील दहा- पंधरा दिवसांपासून उपचार घेत आहेत. तरीही, उपचारादरम्यान अनेकांचा मृत्यू होऊ लागल्याची स्थिती आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा: बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू? प्रशासनाने फेटाळले आरोप

आसरा सोसायटीतील 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शहरात आज 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 41 व 43 वर्षीय व्यक्‍तींचा समावेश आहे. तर आसरा सोसायटीतील 29 वर्षीय तरुणाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असून 12 एप्रिलपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. तर जानकर नगर (लक्ष्मी पेठ) येथील 36 वर्षीय तरुणावर 20 एप्रिलपासून उपचार सुरू होते, परंतु त्याचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 24 हजार 345 झाली असून त्यातील 19 हजार 789 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या तीन हजार 484 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील 310 बेड अजूनही हाउसफुल्लच आहेत. ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या आता 13 हजार 935 झाली असून त्यात ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरची गरज असलेले अडीच हजारांहून अधिक रुग्ण आहेत.