वीर धरणातून नीरा नदीत 23 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीर धरणातून नीरा नदीत 23 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

वीर धरणातून नीरा नदीत 23 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

माळीनगर : नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत आज दुपारी दोन वाजता पाणी सोडण्यात आले आहे. आज सायंकाळी सहा वाजता नीरा नदीत 23 हजार 185 क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: सोनपावलांनी आगमन झालेल्या गौरीसमोर विद्युत रोषणाई

नीरा प्रणालीतील भाटघर धरणात यंदाच्या मोसमात आजपर्यंत 23.50 टीएमसी, वीरमध्ये 8.77 टीएमसी, नीरा देवधरमध्ये 11.73 टीएमसी, गुंजवणीमध्ये 3.64 टीएमसी मिळून एकूण 47.64 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. भाटघर धरण रविवारी शंभर टक्के भरल्याने ते ओव्हरफ्लो झाले.

त्यामुळे त्यातून वीर धरणात विसर्ग सोडण्यात आला. वीर धरणात 11 सप्टेंबरला 75.19 टक्के, 12 सप्टेंबरला 79.60 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. नीरा खोऱ्यातील धरणांच्या परिसरात पावसाचे प्रमाण व आवक वाढत असल्याने वीर धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. आज सकाळी नऊ वाजता वीर धरण 95.68 टक्के भरले.

त्यामुळे वीरमधून नीरा नदीत दुपारी दोन वाजता चार हजार 637 क्यूसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. दुपारी चार वाजता त्यात वाढ करून नऊ हजार 274 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता विसर्गात 13 हजार 911 क्यूसेक्सपर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतरच्या एक तासात तब्बल 10 हजार क्यूसेक्सची वाढ करून सायंकाळी सहा वाजता 23 हजार 185 क्यूसेक्सने नीरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नीरा पात्रात कोणीही जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Web Title: Discharge From Veer Dam Into Nira River At 23000 Cusecs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :veer dam