esakal | आषाढी कालावधीमधील संचारबंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपूर

आषाढी कालावधीमधील संचारबंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर शहर, लगतची दहा गावे आणि श्री विठ्ठल मंदिर परिसरासाठी वेगवेगळ्या कालावधीत संचारबंदी लागू करण्याविषयी नवे आदेश दिले आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रा काळात पंढरपूर (Pandharpur) शहर आणि लगतच्या दहा गावांत 17 ते 25 जुलै असे तब्बल नऊ दिवस संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता. संचारबंदी इतके दिवस लागू करू नये, अशी मागणी लोकप्रतिनिधी, व्यापारी मंडळींनी केली होती. त्याची काही प्रमाणात दखल घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी पंढरपूर शहर, लगतची दहा गावे आणि श्री विठ्ठल मंदिर परिसरासाठी वेगवेगळ्या कालावधीत संचारबंदी लागू करण्याविषयी नवे आदेश दिले आहेत. (District Collector has issued new orders regarding curfew in Pandharpur during Ashadhi period-ssd73)

हेही वाचा: तिन्हीवेळा कर्जमाफीचा लाभार्थी, तरीही कर्ज मिळत नसल्याची तक्रार

येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर पालख्या व दिंड्यांना पंढरपुरात प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. तथापि, मानाच्या दहा पालख्यांना ठराविक लोकांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मानाच्या पालख्यांचा पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात मुक्काम असणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील आणि लगतच्या दहा गावांतील लोक पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी करण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने 17 ते 25 या कालावधीत म्हणजे तब्बल नऊ दिवस पंढरपूर शहर आणि लगतच्या दहा गावांत संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता. हजारो लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या आदेशाचा फेरविचार करावा, अशी मागणी "सकाळ'मधून मांडण्यात आली होती. लोकप्रतिनिधींनी देखील ही मागणी केली होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी हजारो लोकांची मागणी आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सविस्तर आदेश काढला आहे. पंढरपूर शहर आणि गोपाळपूर येथे 18 जुलै रोजी सकाळी सहा ते 24 जुलै रोजी दुपारी चार या काळात संचारबंदी लागू राहील. पंढरपूर शहरातील नगर प्रदक्षिणेच्या आतील बाजूच्या भागात तसेच नदीवरील सर्व घाट, वाळवंट परिसर आणि मंदिर परिसरात 18 जुलै रोजी सकाळी सहा ते 25 जुलै रोजी दुपारी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. पंढरपूर शहराच्या आजूबाजूस असलेल्या भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत 18 जुलै रोजी सकाळी सहा ते 22 जुलै रोजीचे सकाळी सहा या काळातच संचारबंदी लागू राहणार आहे.

हेही वाचा: पडळकरांच्या गाडीवर दगड मारणाऱ्या अमितने छातीवर गोंदवले शरद पवार !

एसटी बससाठी नियमावली

एसटी बस तसेच खासगी बसना 17 जुलै रोजी दुपारी दोन ते 25 जुलै रोजी दुपारी चार या काळात पंढरपूरमध्ये येण्यास व जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

या बाबींसाठी आदेश लागू नाही

अत्यावश्‍यक सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी, मंदिर समिती पंढरपूरकडील पासधारक किंवा परवानाधारक व्यक्ती, कर्तव्यावर असणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी, आषाढी वारीकरिता शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या पालख्या व सोहळे, जीवनावश्‍यक वस्तू व सेवा उदा : दूध आणि दवाखाने, औषध दुकाने, आषाढी कालावधीत पूर्वापार परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुरूप परवानगी देण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत.

loading image