

सोलापूर : सोबत ना कोणता शासकीय लवाजमा, ना सुरक्षा रक्षक. सर्वसामान्य ज्या पद्धतीने सरकारी कार्यालयाच्या रांगेत उभा राहतात, त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयनही हे देखील रांगेत उभा राहतात. सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांची ही कार्यपद्धती आहे. साहेब रांगेत उभा राहिलेत याची खबरबात कधीकधी प्रशासकीय यंत्रणेलाही लागत नाही. रांगेत उभा राहिलेला कधी फोटो अन् व्हिडिओ ते काढत नाहीत. माध्यमे किंवा समाजमाध्यमांवर व्हायरलही करत नाहीत. फक्त प्रश्न जाणून घ्यायचे आणि आपली कामे करायची त्यांची पद्धती आहे. किनवट (जि. नांदेड), पुसद (जि. यवतमाळ) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एस. कार्तिकेयन यांची ही कार्यद्धती सोलापुरातही दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्ष रहा, जिल्हाधिकारी कुठेही अन् कधीही सर्वसामान्यांच्या रांगेत दिसतील, असा मेसेज प्रशासकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन हे तामिळनाच्या मदुराई जिल्ह्यातील रहिवासी आहेत. २०२० मध्ये युपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची प्रशासकीय सेवा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात झाली आहे. प्रशसकीय यंत्रणेला माहिती देऊन तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्यावर सर्वसामान्यांचे खरे प्रश्न समजत नाहीत. त्यामुळे त्या भागात सध्या काय सुरू आहे?, प्रशासन म्हणून काय केले पाहिजे? याचा अंदाज येत नाही. त्या त्या भागातील गरजा ओळखून त्या दृष्टीने प्रशासनाच्या कामाची दिशा ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन ही पद्धती अवलंबत असल्याचे दिसते.
कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ज्योतिबा यात्रेत कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्वसामान्य म्हणून यात्रेत सहभाग घेतला होता. त्यातून पोलिसांच्या स्वच्छतागृहाची उणीव त्यांना समजली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या पत्नी यशनी नागराजन या देखील आयएएस अधिकारी आहेत. त्या जून २०२४ पासून सातारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पंढरपूरच्या आषाढी यात्रा नियोजनात सातारा जिल्ह्याचाही सहभाग असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना आषाढी यात्रा, पंढरपूर, वारकरी परंपरा या सर्व बाबी सोलापूरचे जिल्हाधिकारी होण्यापूर्वीच बारकाईने माहिती आहेत.
सर्वसामान्यांच्या भेटीसाठी सोमवार अन् शुक्रवार
तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सर्वसामान्यांना सोमवारी व शुक्रवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत भेटत होते. दरम्यानच्या काळात विषयाचे गांभीर्य पाहून सर्वसामान्यांची भेट, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संबंधित विभागाला सूचना दिल्या जात होत्या. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी हीच पद्धत कायम ठेवली आहे. सर्वसामान्यांना त्यांचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची वेळच पडू नये, प्रशासन आणखी सतर्क व तत्पर करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.