
सर्पांच्या मिलनात आणू नका व्यत्यय
सोलापूर - सापांचे मिलन सुरू असताना त्यांच्या अंगावर नवीन कपडा टाकून तो जवळ बाळगल्याने समृद्धी येते, अशी अंधश्रद्धा आहे. अशी कृती करून सापाच्या मिलनात व्यत्यय आणू नये. सापाला दूध पाजू नका, दूध हे सापासाठी विष आहे, असे आवाहन सर्परक्षक सुरेश क्षीरसागर यांनी केले आहे.
सामान्यपणे मार्च ते जुलैच्या दरम्यान धामण सापांच्या मिलनाचा काळ चालू असतो. परंतु त्यासाठी मादीला आकर्षित करण्यासाठी दोन तर काहीवेळेस तीन नरांना आपापसांत द्वंद्वयुद्ध करावे लागते. या द्वंद्वयुद्धात एकमेकाला चावा न घेता आपल्या ताकदीने फक्त खाली पाडण्याचा प्रयत्न केला जातो. या युद्धामध्ये जो नर धामण जिंकेल तो त्या परिसरातील मादीबरोबर मिलन करून पुढची प्रजावळ वाढवतो. मादी धामण एका वेळेस ६ ते १४ अंडी घालून दूर निघून जाते. साधारण दोन महिन्यांनंतर अंड्यांतून पिल्लं जन्माला येतात. कुठेही सापांचे मिलन अथवा द्वंद्वयुद्ध चालू असेल तर त्यामध्ये कुठलीही बाधा आणू नये. बऱ्याच वेळा सापांचे मिलन अथवा द्वंद्वयुद्ध चालू असेल तर त्या सापांवर कापड टाकणे, अगरबत्ती लावून नारळ फोडणे असे प्रकार घडतात. ही सर्व अंधश्रद्धा आहे.
अभ्यासकांच्या माहितीनुसार सोलापुरात एकूण २६ प्रजातींचे साप आढळतात. त्यात दोन निमविषारी, पाच विषारी प्रजातींचे साप आढळतात. प्रामुख्याने मनुष्य वस्तीत चार प्रमुख विषारी प्रजातीचे साप आढळतात. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे प्रमुख चार विषारी साप आहेत.
- सुरेश क्षीरसागर, सर्परक्षक, सोलापूर.
सापांबद्दलची अंधश्रद्धा
गैरसमज : साप माणसांचा पूर्वज किंवा देवता आहे.
स्पष्टीकरण : सापांची उत्क्रांती सरड्यासारख्या प्राण्यांपासून झालेली आहे. इतर सजीवांप्रमाणेच तो एक प्राणी आहे.
गैरसमज : नागाच्या डोक्यावर नागमणी असतो.
स्पष्टीकरण : चित्रपटातील काल्पनिक कथांवरून सापांविषयी अनेक अंधश्रद्धा तयार झाल्या आहेत. नागाच्या डोक्यावर नागमणी असता तर तो गारुडी गरीब राहिला असता का!
गैरसमज : साप दूध पितो.
स्पष्टीकरण : म्हशीच्या पायाला गाठ मारून धामण साप दूध पिते किंवा साप दूध पितो, असाही एक गैरसमज आहे. दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. दूध हे सापासाठी विषच आहे. म्हणून सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये. दूध हे सस्तन प्राण्याचे अन्न आहे. साप हा सस्तन प्राणी नसून सरपटणारा प्राणी आहे.
Web Title: Do Not Disturb Mating Of Snakes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..