
सोलापूर : चिमुकल्यांची (वयोगट १२ वर्षांपर्यंत) वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची प्रवासी क्षमता दीडपट असते. त्याहून अधिक मुलांना बसवून दाटीवाटीतून ने-आण करणाऱ्या चालकाला १० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. शाळा सुरु होण्यापूर्वीच सोलापूर शहर व परिसरातील ९४७ स्कूलबस चालकांपैकी ८६१ बस चालकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेतले आहे. कागदपत्रे तथा फिटनेस नसताना स्कूल बस रस्त्यांवर दिसल्यास त्या चालकावर गुन्हा सुद्धा दाखल करण्याचा इशारा ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
पालकांनीही आपली मुले ज्या वाहनातून शाळेत जातात, ते व्यवस्थित आहे का, चालक कसा आहे, याची खात्री करावी. प्रत्येक शाळांनी स्कूल बस कमिटीद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणींवर जाणून घ्याव्यात. अनफिट किंवा वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या बसवर आमचा सतत वॉच असेल, अशी ग्वाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.
स्कूलबस अशी हवी, अन्यथा...
- प्रथमोपचार साहित्य व औषधे उपलब्ध असावीत.
- अधिकृत संस्थेची प्रमाणित ५ किलोग्रॅम वजनाचे दोन अग्निशमन यंत्रे (एक चालक कक्षात व दुसरे संकटसमयी बाहेर पडावयाच्या मार्गाजवळ) बसवणे बंधनकारक आहे.
- बसच्या खिडक्यांना तीन आडव्या दांड्या असाव्यात. दोन दांड्यांमधील अंतर ५ सेमीपेक्षा अधिक असू नये. मुलांच्या बॅग्ज, पाणी बॉटल्स, जेवणाचे डबे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी.
- बसची सर्व आसने समोरील बाजू असावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. शालेय बसवर कोणतीही व्यावसायिक जाहिरात नसावी.
स्कूलबस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना....
- चालक प्रशिक्षित असावा. बसमध्ये एक पुरुष- एक महिला परिचर असावी. विद्यार्थी बसमध्ये चढ-उतार करताना त्यांच्या सुरक्षिततेकडे त्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे.
- चालकास ५ वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव बंधनकारक; वाहतुकीच्या कोणत्याही गुन्ह्यात त्यास दंड झालेला नसावा. वाहतुकीचा परवाना, बिल्ला त्याच्याकडे हवाच.
- बसमध्ये धूम्रपान नको; बस चालू झाल्यावर दरवाजे बंद असावेत; बसमध्ये कोणतेही संगीत लावू नये. कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कोणतेही खाद्यपदार्थ अथवा पेय देऊ नये.
- बसथांब्यावर अधिकृत व्यक्ती हजर नसल्यास विद्यार्थ्यास शाळेत परत आणावे आणि पालकांना बोलावून त्यांच्याकडे सोपवावे.
- बसमधील सर्व कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रे असावे, स्वच्छ गणवेश सक्तीचा. सर्व कर्मचाऱ्यांना मराठी-हिंदी-इंग्रजीचे ज्ञान असावे.
बसची स्थिती तंदुरुस्त असावी
- स्कूल बसची यांत्रिक स्थिती उत्तम असावी. आरटीओकडील फिटनेस (योग्यता) प्रमाणपत्र त्यांच्याकडे बंधनकारक आहे.
- स्कूल बस पिवळ्या रंगाच्या असतील, तसेच बसेसच्या पुढे व मागे ‘शालेय बस’ असे ठळक अक्षरात लिहिलेले असावे. मोठ्या आवाजाचे हॉर्न नसावे.
- स्कूलबस नोंदणीपासून १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी. मुंबईत ही मर्यादा ८ वर्षे आहे. तर सीएनजी बससाठी ही मर्यादा १५ वर्षे आहे.
- प्रत्येक बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, रक्तगट, बसमध्ये चढण्याचे व उतरण्याचे ठिकाण व मार्ग दर्शविणारे विवरणपत्रक उपलब्ध असावे. मुंबई वगळता इतर महापालिकांच्या क्षेत्रात बसचा वेग ताशी ५० किमी निश्चित आहे.
- शाळेचे नाव, मार्ग क्रमांक लिहिलेले दोन फलक आवश्यक आहे. हा फलक समोरील बाजूच्या डाव्या बाजूला खिडकीजवळ असावा.
- बसमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नसावेत; प्रत्येक बसमध्ये सुरक्षा दांडे, हाताने धरावयाचे कठडे, संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग, प्रथमोपचार संच, अग्निशमन यंत्र गरजेचे आहे.
नियमांचे व्हावे तंतोतंत पालन, अन्यथा...
स्कूलबस चालकांनी वाहन चालवताना मोबाईल वापरू नये. विद्यार्थ्यांनी खिडकी अथवा दरवाजातून डोके-हात बाहेर काढू नये. प्रत्येक स्कूलबससाठी ‘फिटनेस’ बंधनकारक असून त्यांनी २०११ मधील स्कूलबस नियमावलींचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. आपल्या भरवशावर चिमुकली वाहनातून घरी जात आहेत, याचे भान नेहमीच चालकांनी ठेवावे.
- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
सोलापुरातील विद्यार्थी वाहतुकीची स्थिती
एकूण स्कूल बस
९४७
एकूण ॲटोरिक्षा
१६,३२१
बसद्वारे प्रवासी करणारे विद्यार्थी
५३०००
अनफिट स्कूल बस
८६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.