esakal | "माणसा सुधर, नाही तर प्रत्येक घर होईल दवाखाना !'
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus

"माणसा सुधर, नाही तर प्रत्येक घर होईल दवाखाना !'

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सध्याची परिस्थिती खूपच भयावह आहे. जेवढा पेशंटचा लोड आहे तेवढा ऑक्‍सिजन नाही, बेड नाहीत. व्हेंटिलेटर्स आवश्‍यक तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. हा कोरोना पूर्वीसारखा राहिला नाही की आज शंभर आले, उद्या 120 आले; तर असंख्य रुग्णंसख्येत वाढ होत आहे. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. हीच गती राहिली तर खरोखरच सांगता येणार नाही की पुढील पंधरा - वीस दिवसांनंतर परिस्थिती काय असेल, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी यांनी दिला आहे.

सध्याची कोरोनाची लाट पाहता, आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्‍त केली आहे. त्यांच्या मते, जर लाट नियंत्रित नाही आली, तर दोन शक्‍यता वाटतात, एक तर माणसांचा मृत्यू जनावरांसारखा होण्याची शक्‍यता आहे. लोकं रस्त्यावर पडलेली दिसून येऊ शकतात, अशी भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. किंवा प्रत्येक घर एक दवाखाना होऊन जाईल. डॉक्‍टरांना पेशंटच्या घरी जाऊन सलाईन- इंजेक्‍शन अशा ट्रेनिंग कराव्या लागतील.

हेही वाचा: बाईकवर डबलसीट फिरताय तर सावधान ! लायसनसह होणार वाहन जप्त

खरोखरंच संपूर्ण लॉकडाउनची गरज आहे; कारण आपल्याकडे शिस्त पाळली नाही जात. त्यामुळे सर्व गोष्टी दूर सारून संपूर्ण व कडक लॉकडाउन आवश्‍यक आहे. हा काही कायमचा उपाय अर्थातच नाही आहे, परंतु सध्याची लाट कंट्रोल करण्यासाठी कडक लॉकडाउन गरजेचा आहे.

तज्ज्ञांच्या दृष्टीने दोन गोष्टी होऊ शकतात, की काही दिवसांत दवाखाने व कोव्हिड सेंटर्स पुरणार नाहीत; तर कदाचित प्रत्येक घर एक दवाखाना होईल व नातेवाइकांना पॅरामेडिकल स्टाफसारखे ट्रेनिंग देऊन त्यांनाच रुग्णांवर ट्रीटमेंट देण्याची वेळ येऊ शकते. कदाचित अत्यंत भयावह असा टोक असू शकतो. रुग्ण हॉस्पिटलच्या गेटवरच अत्यवस्थ अवस्थेत पडलेले दिसू शकतात.

हेही वाचा: करेक्‍ट कार्यक्रम कुणाचा? 2 मे रोजी कळणार मतदारांचा फैसला

कोव्हिड विषाणूने स्वत:मध्ये बदल केला मात्र माणसाने परिवर्तन केलं नाही

या परिस्थितीला कारणीभूत आपण स्वत: आहोत, सरकारला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. कितीही एज्युकेट केलं तरी लोक मास्क वापरत नाहीत. सॅनिटायझेशन केलं जात नाही. आणि त्याच्यावर आता हा डबल म्यूटंट स्ट्रेन आहे. हा आटोक्‍यात येणं कठीण वाटतं. ज्या वेळेस विषाणू स्वत:मध्ये परिवर्तन करतोय, परंतु माणूस स्वत:च्या वागणुकीत वा वर्तणुकीत परिवर्तन करत नाही. इथे माणसानं परिवर्तन केलं नाही अन्‌ विषाणूनं परिवर्तन केलं. जो परिवर्तन करतो तो जिंकतो. माणूस हरेल व विषाणू जिंकेल. तर माणसा, परिवर्तन कर व आपल्या सवयी बदल, असाच यामागचा खरा धडा आहे.

- डॉ. विजय अंधारे, (कार्डियो थोरसिक सर्जन) हृदय, फुफ्फुस शल्य विशारद