esakal | चिखलठाणचा दोडका सुरतेच्या बाजारात! दोन एकरमधून पाच लाखांचे उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

Crop

चिखलठाणचा दोडका सुरतेच्या बाजारात! दोन एकरमधून पाच लाखांचे उत्पन्न

sakal_logo
By
गंगाधर पोळ

चिखलठाण (सोलापूर) : चिखलठाण (ता. करमाळा) येथील तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकलेल्या दोडक्‍याचे गुजरात राज्यातील सूरत बाजारात मार्केटिंग करत पन्नास दिवसांत दोन एकर क्षेत्रामध्ये पाच लाख रुपये मिळवले तर आणखी तीन लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे.

कलिंगड, खरबूज, मिरची यांसारखी नेहमी वेगळी पिके घेणाऱ्या येथील सचिन गव्हाणे या तरुण शेतकऱ्याने यावर्षी आपल्या शेतात दोन एकर क्षेत्रामध्ये दोडक्‍याचे पीक घेऊन भरघोस उत्पादन घेतले आहे. त्याने सुरवातीला शेतात नांगरट करून तीन ट्रेलर शेणखत व कोंबडीखत आणि त्यातच रासायनिक बेसल खत घालून बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरून अडीच फूट अंतरावर नागा एफ वन या जातीच्या दोडक्‍याची लागण केली. ठिबक संचाच्या माध्यमातून योग्य पाणी व खत व्यवस्थापन करत चाळीस दिवसांत दोडक्‍याचे पीक उभे केले.

बांबू व तारेचा मंडप तयार करून त्यावर दोडक्‍याचे वेल चढवले आहेत. पीक काढणीपर्यंत दीड लाख रुपयांचा खर्च आला आहे. चाळीस दिवसांत उत्तम प्रतीचे पीक तयार होऊन त्याच्या काढणीला सुरवात केली. बॉक्‍समध्ये पॅकिंग करून तो सुरवातीला गुजरात येथील सूरत मार्केटला पाठवला. तेथे त्याला चांगला दर मिळाला. व्यापाऱ्यांनी आणखी दोडके पाठवण्यास सांगितले. सुरवातीला 35 ते 38 रुपयांपर्यंतचा दर मिळाला तर सध्या 22 ते 27 रुपयांपर्यंत दर मिळत असून आजपर्यंत 25 टन दोडक्‍यापासून पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर अजून पंधरा टन पीक अपेक्षित असून त्यापासून तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

कोरोना निर्बंधांमुळे थोडाफार दरावर परिणाम झाला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा एक ते दीड लाख रुपये उत्पन्न कमी आले. मुबलक पाण्यावर ऊस व केळी यांसारखी पिके घेणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना गव्हाणे यांचा दोडका शेतीचा प्रयोग मार्गदर्शक ठरत आहे.

दरवर्षी मी माझ्या शेतात बाजारपेठेचा अंदाज घेऊन कमी दिवसांत येणाऱ्या पिकांचे भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अपेक्षित दर न मिळाल्यास वेगळी पिके घेण्याचा उत्साह कमी होतो. यावर्षी कोरोनाच्या स्थितीमुळे थोडंसं घाबरतच दोडक्‍याचे पीक निवडले. परंतु सूरत बाजारपेठेत चांगला दर मिळाल्याने चांगले उत्पन्न मिळू शकले आहे.

- सचिन गव्हाणे, शेतकरी, चिखलठाण