तुमचं सगळं ठिकाय... पन, 'लक्ष्मी'दर्शनाचं कसं? | Political | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुमचं सगळं ठिकाय... पन, 'लक्ष्मी'दर्शनाचं कसं?
तुमचं सगळं ठिकाय... पन, 'लक्ष्मी'दर्शनाचं कसं?

तुमचं सगळं ठिकाय... पन, 'लक्ष्मी'दर्शनाचं कसं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील (Maharashtra) इदान परिषदेच्या (Legislative Council) सहा जागांसाठी विलेक्‍शन जाहीर झालं. सोलापूरच्या परशांत मालकांचं इदान परिषदेचा कालावधी संपला... आता सोलापूरच्या जागेचीबी विलेक्‍शन हुईल असं वाटलं हुतं... सोलापुरात भाजपचं (BJP) कुणीबी हुभारु दे निवडून येईल, असं गणित असल्यानं तसंच महाइकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi Government) सोलापूर ही अडचण असल्यानं सोलापूरला या विलेक्‍शनमदून पद्धतशीरपणे वगळलं... नव्यानं जाहीर झालेल्या नगरपंचायती अन्‌ नगरपरिषदांचं विलेक्‍शन झाल्यावर फुढं हे विलेक्‍शन घेऊ, असं म्हणणं दिलंया...

खरं तर सगळ्यांबरुबर सोलापूरचंबी विलेक्‍शन लागण्याची गरज हुती... पन संख्याबळात कॉंग्रेस, राष्ट्रवादी अन्‌ शिवसेना असं मिळून एकत्रित गणित लईच कमी पडू लागलंया... तर भाजपचं गणित लईच म्होरं जात असल्याचं दिसू लागल्यानं हे परकरण जरा येगळं हाताळण्यासाठीचीच ही मुदत घेतल्याचं दिसू लागलंया... 1998 मदी असंच इचित्र गणित हुतं... पन कॉंग्रेसचं संख्याबळ असतानाबी भाजपकडनं बापूनं विलेक्‍शन जिंकून लईच मोठ्ठी करामत केली हुती... तुमचं सगळं ठिकंय हो पन्‌ आमच्या लक्ष्मी दर्शनाचं गणित कसं जमणार असं आताच्या मतदारांत चर्चा सुरु झालीया... तातडीनं कोर्टात जावा अन्‌ सोलापूरची निवडणूक लावून घ्या असंबी लई मेंबरचं म्हणणं हाय... त्येचं कारणबी तसंच हाय... इदान परिषदेचं विलेक्‍शन झाल्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर आपल्या विलेक्‍शनचा काही परमाणातील खर्च उमेदवाराकडनं वसूल हुईल, असं वाटू लागलंया...

हेही वाचा: भ्रष्टाचाराचा अड्डा बनली ZP! विरोधी पक्षनेते बळिराम साठेंचा आरोप

इदान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारांना फकस्त लक्ष्मी दर्शनाचं सपान पडू लागलं हुतं... काहींनी तर देवच पाण्यात ठेवलं हुतं... सोलापूरच्या या विलेक्‍शनला स्थगिती दिल्यानं जिल्ह्यातील सर्वच मतदारांना देव (लक्ष्मी) काय पावणार नसल्यानं लईच नाराजी वाढली हाय... आरक्षण अन्‌ मतदारसंघाच्या पुनररचनेमुळं फुडच्या विलेक्‍शनला मतदान करायला हामी रातावं का नाय, हेच मुळात आमाला समजंना गेलंया... त्यामुळं आताच ही निवडणूक झाली तर लई झकास... असंबी वाटू लागलंया... पण लईच मोठ्ठी माशी शिंकल्यागत झालंय राव!

गेल्या वक्ताला आबाकडनं अन्‌ मालकाकडनं तुमडी भरुन घेतलेल्यांना तर लईच वंगाळ वाटू लागलंया... पक्ष कोणताबी राहो पन दोनीबी उमेदवार आपल्यावर कृपा करत्यात असा अनुभव होता... आता भाजपकडनं मालकाचं तिकिट पक्क झालंया... त्येनी कामबी सुरु केलंया... पन त्या माढा तालुक्‍यातील रिधोरे गावच्या माजी सैनिकानं मालकाच्या गाडीवर ऑईल फेकलं... यातून येगळ्याच वातावरण निर्मितीला सुरवात झालीया... त्याला प्रत्युत्तर म्हणून कुर्डुवाडीत दुग्धाभिषेक करायचं कार्यकर्त्यांनी ठरवलं हुतं... पण मालकाचा पॅटर्न येगळा... त्ये काय शिरीकांतदादावानी आपल्यावरच गोळीबार करुन येगळं वातावरण निरमाण करणाऱ्यातला नाय... त्येंनी दुग्धाभिषेकाला नकार दिला... मग कार्यकर्त्यांनी त्येंच्यावर फुलं उधळली, सत्कार केला... आता याफुढं असं येगयेगळ्या परकाराला तोंड द्यावंच लागणार हाय... पण विलेक्‍शनसाठी कोर्टात मात्र जावं लागणार हे निश्‍चित! नायतर आताच्या मतदारांची लक्ष्मी दर्शनाइना मोठी पंचाईतच हुणार!

- थोरले आबासाहेब

loading image
go to top