
Solapur News : सुशीलकुमार शिंदे यांनी डाॅ. धवलसिंह मोहिते- पाटील यांना दाखविला 'हात'
- शिवाजी भोसले
सोलापूर : अकलूजचे मोहिते-पाटील घराणे पर्यायाने डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची निवड यामध्ये काँग्रेसमधील बडे प्रस्थ सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची आमदार कन्या प्रणिती शिंदे हे दुखावलेले गेलेले. त्यातच पुन्हा डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी शिंदे पिता-कन्येला विश्वासात न घेता जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्यांच्या केलेल्या परस्पर निवडी हे सर्व पाहता ‘जखम जुनीच, ओरखडा मात्र नवा’ असेच निरीक्षण याबाबतीमधील नोंदवता येईल.
शिंदे आणि मोहिते गटांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून गटातटाचा सुप्त वाद होता. तथापि, काँग्रेस पदाधिकार्यांच्या निवडीवरुन जिल्हा काँग्रेसमध्ये ‘जनवात्सल्य’ आणि ‘प्रतापगड’ म्हणजे शिंद गट आणि मोहिते-पाटील गट असा गटातटाचा वाद उफाळला गेला आहे. यामध्ये शिंदे पिता-कन्या यांनी पदाधिकार्यांच्या निवडींना स्थगिती मिळवून ‘हम है काँग्रेस के सिंकदर’ याचा प्रत्यय आणून देत अकलूजच्या सिंहाला चांगलाच ‘हात’ दाखवला आहे.
यामध्ये स्वाभिमान दुखावलेला अकलूजचा सिंह हा ‘सिंहावलोकन’ करणार की प्रतागडाचा स्वाभिमानी छावा म्हणून शिंदेशाही विरोधात डरकाळ्या फोडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे राजकारण करताना अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याकडून सुशीलकुमार शिंदे तसे कधी काळी म्हणे दुखावले गेलेले.
त्यातच त्यांचा विरोध असताना या घराण्यामधील डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचे सिंहासन बहाल केले गेले.तद्नंतर या पदाची गादी सांभाळताना डॉ. मोहिते-पाटील यांच्याकडून शिंदे पिता-कन्येच्या मनाविरूध्द काही गोष्टी घडलेल्या. या सगळ्या जखमा शिंदे पिता- कन्येला सलत असतानाच, अकलूजच्या सिंहाने जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्षपद सतवासुभा अन् स्वत:चे साम्राज्य मानत शिंदे पिता-कन्येला न विश्वासात घेता जिल्हा काँग्रेसमधील काही पदांच्या निवडी परस्पर केल्या असा आरोप आहे.
डॉ.मोहिते-पाटील यांच्याबद्दल म्हणे शिंदे पित्या-कन्येला अगोदरच जखमा होत्या, अशातच जखमेचा पुन्हा नखा ओरखडा जणू अकलूजच्या सिंहाकडून निघाला. जखमांमधून स्वत्व अन् स्वाभिमानाचे रक्त भळाभळा वाहिले.शिंदे पिता-कन्येचे स्वत्व स्फुरले गेले. स्वाभिमान जागृत झाला. तशा म्हणे त्यांनी हालचाली वाढल्या.काँग्रेसमध्ये स्वत:चे मोठे वलय असलेल्या शिंदे पिता-कन्येने पडद्याआडून जे काही करायचे ते केले.
ते शिजवायचे ते शिजवले आणि अकलूजच्या सिंहाने डरकाळ्या फोडत जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकार्यांच्या केलेल्या निवडींना स्थगिती मिळवत ‘कॉग्रेस के हम है सिंकदर’ याचा प्रत्यय शिंदे पिता-कन्येने आणून देत अकलूजच्या सिंहाला ‘हात’ दाखवलेल्या चर्चेचे मोहोळ आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उठले आहे.
शिंदे पिता-कन्येनं ‘हात’ दाखविल्यानंतर ‘हम भी कुछ कम नही’ अशी डरकाळी फोडत म्हणे अकलूजच्या सिंहाने काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना गाठले.आपण केलेल्या निवडी योग्यच आहेत, काँग्रेस सभासद नोंदणी आणि भारत जोडो या अभियानामध्ये ज्यांनी प्रभावी काम केले, त्या कामांना ‘स्टेथोस्कोप’ लावूनच आपण यापदाच्या निवडी केल्याचा सुर डॉ. धवलसिंहानी आळवत निवडीला दिलेली स्थगिती मागे घेण्याबाबत काँग्रेसच्या नाना यांना पटवण्याचा प्रयत्न केला. पण या वेळी मात्र त्यांनी मोहिते-पाटील यांना ‘नन्नाचा पाढा’ ऐकवला.
दरम्यान त्याला कारणदेखील तसेच असावे. सुरवातील डॉ.धवलसिंहाची आणि पुढे प्रदेश प्रवक्तेपदी प्रा.मनोज कुलकर्णी यांच्या निवडी करताना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी स्पीचच्या पुढे जाऊन बॅटीग केली होती, त्याची मोठी गहजब शिंदे पिता- कन्येनं केवळ प्रदेशच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसमध्ये केली होती, अशातच पुन्हा डॉ. धवलसिंहांचे ऐकले तर खुप रान पेटेल.
सुशीलकुमार शिंदे हे आपणास ‘ईट का जबाब पत्थरसे’ देत ‘हात’ दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, हे ओळखूनच म्हणे प्रदेशाध्य नाना पटोले यांनी पदाधिकार्यांच्या निवडीला दिलेल्या स्थगितीचा दिलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत डॉ.धवलसिंहांची बोळवण केली अशी चर्चा मुख्य ‘जनावात्सल’ सह काँग्रेस भवानच्या वर्तुळात आहे.
काँग्रेस पदाधिकार्यांच्या निवडीच्या पेटलेल्या विषयावरुन शिंदे पिता-कन्येने डॉ.धवलसिंहाना ‘हात’ दाखविला. काँग्रेसमध्ये आपण ‘वजनदार’ आहोत हेदेखील अधोरेखीत केले. जिल्हा काँग्रेसमधील इथंपर्यंतचा नाट्याचा अंक ठीक. पण पुढे आता काय? याची प्रतिक्षा जिल्ह्यातील या पक्षातील सर्वच नेतेमंडळी, पुढारी आणि पदाधिकारी यांच्यासह खास करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज असलेल्या इच्छुकांचे काय? हा ‘कळी’चा मुद्दा आहे.
लोकसभा निवडणुक अन् विश्वासामधील चेहरे
डॉ.धवलसिंहांनी पदाधिकारी म्हणून निवडलेल्या चेहर्यांना विरोध आहे. पदाधिकारी म्हणून जे काही चेहरे निवडायचे आहेत, म्हणे ते चेहरे खास करुन सुशीलकुमार शिंदे यांच्या मर्जीमधील आणि त्यातही विश्वासाचे हवेत.
सोलापूर लोकसभेची निवडणुक काँग्रेसकडून लढण्याचा निर्णय सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतीत होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील काँग्रेसच्या खास करुन सोलापूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकार्यांचा निवडीचा विषय महत्वाचा वाटतो म्हणून शिंदेशाहीचा ‘व्होरा’ पदाधिकारी निवड स्थगितीचा असावा असा बोलबाला आहे.
दूजाभावाचा निर्णय का?
प्रा.मनोज कुलकर्णी यांना काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हे पद देण्याला आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोध केल्याच्या चर्चेचे वादळ उठले होते. प्रा.कुलकर्णी यांची निवड रद्द करावी, यासाठी खुद्द प्रणिती शिंदे यांनी आग्रही होऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रयत्न केले होेते, असा बोलबाला शहर आणि जिल्हा काँग्रेसह प्रदेश काँग्रेसमध्येदेखील होता अशी चर्चा उघड होती.
दरम्यान प्रा.कुलकर्णी यांच्या निवडीचा निर्णय पटोले यांनी कायम ठेवला, असे असताना आता आमच्या केलेल्या निवडीला प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडून स्थगिती का? निवडीच्या निर्णयामध्ये दूजाभाव का? असा सवाल ज्यांच्या काही निवडी झाल्या आहेत, त्यापैकी काहीजणांकडून उपस्थित केला आहे