
पंढरपूर (सोलापूर) : पोलिओची लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात प्लास्टिकचा सूक्ष्म तुकडा गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाळवणी (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (ता. 31) पोलिओ लसीकरणा दरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे लसीकरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या राजेश्री ताड यांनी जिल्हा प्रशसानाकडे केली आहे.
कोरोनामुळे लांबणीवर पडलेली पोलिओ लसीकरणाची मोहीम रविवारी सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात आली. जास्तीत जास्त मुलांना पोलिओ लस देण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रासह अंगणवाड्यांमध्ये लसीकरणाची सोय केली होती.
रविवारी सकाळी भाळवणी येथील माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. लस देताना वैद्यकीय केंद्रातील एक महिला लांबूनच बाळांच्या तोंडात लस टाकत होती. अशीच बुरांडे यांच्या लहान बाळाच्या तोंडात लस टाकत असताना हलगर्जीपणामुळे लसीबरोबरच ड्रॉपरचे टोपणही (प्लास्टिकचा लहान तुकडा) बाळाच्या तोंडात गेला. हा प्रकार येथील वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांच्या समोर घडला. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास सुरू झाला. त्यानंतर माधुरी बुरांडे यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्त्या राजेश्री ताड यांना सांगितली.
ताड यांनी आधी उपाचारासाठी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांना याबाबत विचारले असता त्यांनी ताड यांना सविस्तर माहिती देण्याऐवजी उलट त्यांच्याशी हुज्जतही घातली.
आज संबंधित बाळाला येथील शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी पाठवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या ताड यांनी दिली. दरम्यान, या प्रकाराला येथील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाई करावी, अन्यथा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही राजेश्री ताड यांनी दिला आहे.
रविवारी पोलिओ लसीकरणाच्या वेळी माधुरी बुरांडे यांच्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओ लस देताना त्याच्या पोटात प्लास्टिकचा लहान तुकडा गेला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय स्कॅनिंग देखील केले आहे. रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार केले जातील. बाळाच्या आरोग्याला कोणताही धोका नाही.
- ए. डी. रेपाळ,
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, भाळवणी
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.