
मोहोळ (सोलापूर) : महावितरणने मोहोळ तालुक्यातील वीज जोडणी तोडण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेली पिके सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे यंदा शेतकरी जास्तच तोट्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांकडे गेल्या तीन-चार वर्षांपासूनची शेती पंपाची थकबाकी आहे. महावितरणने अव्वाच्या सव्वा बिले दिली आहेत. महावितरणने गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना वीज बिलाबाबत आज जसा तगादा लावला आहे, असा तगादा मागे लावला नाही, नव्हे शेतकऱ्यांना वीज बिलेही पोचली नाहीत. सध्या शेतात टोमॅटो, खरबूज, कलिंगड, डाळिंब, द्राक्ष, वांगी, मिरची आदी पिके आहेत. ही पिके विक्रीयोग्य झाली आहेत. मात्र विद्युत पुरवठा खंडित केल्यास यातील एकही पीक हाती लागणार नाही. शासनाच्या लॉकडाउनच्या इशाऱ्याने अनेक फळपिकांचे व वेलवर्गीय पिकांचे दर पडले आहेत. टोमॅटो तर रस्त्यावर ओतून देण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक वर्षी वीज बिलाची वसुली कडक केली तर महावितरणला व शेतकऱ्यांनाही त्रासदायक ठरणार नाही. मात्र अचानक लाखोंची बिले भरा म्हणून तगादा लावला तर शेतकरी पैसे भरू शकत नाहीत. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांकडे काहीच उत्पन्न आले नाही. त्यामुळे दररोजचा खर्च भागवणे मुश्किलीचे झाले आहे. त्यातच पुन्हा लॉकडाउनच्या घोषणेने शेतकरी पूर्णपणे गर्भगळीत झाला आहे.
शेतकऱ्याकडे सध्या द्राक्ष, डाळिंबसारखा माल आहे. परंतु त्याची गाडी भरली अन् अचानक लॉकडाउनची घोषणा झाली तर त्या मालाचे काय करायचे, हा प्रश्न आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान होणार आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी, मिरची ही पिके सध्या बहरात आहेत. मात्र विद्युत पुरवठा खंडित केल्याने पाणी नाही मिळाले तर सर्व फुले गळून जाणार आहेत. शेतकऱ्यांना बिले वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे किती बिल आहे, हेच शेतकऱ्यांना माहिती होत नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत वीजबिल माफ करणे व पुढची वसुली कडक करणे हाच पर्याय असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक शेतकऱ्यांनी आष्टी तलाव, उजनी डावा कालव्यावरून जलवाहिन्या टाकून आपल्या शेतापर्यंत पाणी आणले आहे, त्याची बरीच थकबाकी आहे. पाटबंधारे विभागाने वसुलीचा फास आवळला आहे. त्यामुळे वीजबिल वसुलीमुळे शेतकरी हतबल झाला आहे.
भाजीपाल्याचे दर (प्रतिकिलो)
वीजबिल वसुलीसाठी आमची हरकत नाही; मात्र पाच वर्षाची बिले जर एकदाच मागितली किंवा निम्मे जरी मागितली तरी ते भरणार कोठून? भाजीपाला व इतर मालाचे दर कोलमडले आहेत. वेळच्या वेळी वसुली केली तर अडचण येत नाही. शेतकऱ्यांना त्याचे बिल मिळाल्यावर त्याची सही घ्यावी जेणेकरून त्याला नियोजन करणे सोपे होईल.
- समाधान भोसले,
शेतकरी
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागत आहे. आम्हालाही माहिती आहे, शेतकरी अडचणीत आहे. मात्र काही तरी रक्कम भरून सहकार्य करावे. ट्रान्स्फार्मरला किमान 60 ते 70 टक्के तरी रक्कम भरावी हीच अपेक्षा.
- हेमंत ताकपेरे,
उपकार्यकारी अभियंता, मोहोळ
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.