esakal | पोटनिवडणुकीमुळे पंढरपूर-मंगळवेढ्यात कोरोनाचा विस्फोट ! वीस दिवसांत रुग्णसंख्या चौपट
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

पोटनिवडणुकीमुळे पंढरपूर-मंगळवेढ्यात कोरोनाचा विस्फोट ! वीस दिवसांत रुग्णसंख्या चौपट

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : देशात आणि राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशातच पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकी दरम्यान सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी कोरोना महामारीचे भान ठेवणे आवश्‍यक होते. परंतु, नेत्यांनी कोरोनाचे नियम मोडून हजारोंच्या प्रचार सभा घेतल्या. परिणामी, दोन्ही तालुक्‍यांत कोरोना पसरला.

मागील 20 दिवसांपूर्वी दोन्ही तालुक्‍यांत केवळ 60 वर असलेली कोरोना रुग्णांची संख्या निवडणुकीनंतर चौपट होऊन 246 इतकी झाली आहे. तर दुसरीकडे, याच दरम्यान 10 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. निवडणुकीनंतर आता निकालाऐवजी मतदारांना आपल्या जीवाची चिंता लागली आहे.

हेही वाचा: पंढरपूर, मंगळवेढ्याचीच चिंता ! जिल्ह्यात आज वाढले 1449 रुग्ण; 40 जणांचा मृत्यू

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. 1 ते 17 एप्रिल दरम्यान राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर अपक्ष उमेदवारांनी गावोगावी जाऊन मतदारांच्या बैठका व कॉर्नर सभा घेतल्या. त्यानंतर भाजप व राष्ट्रवादीच्या राज्यभरातील अनेक नेतेमंडळींनी पंढरपूर व मंगळवेढ्यात येऊन जाहीर प्रचार सभा घेतल्या. दोन्ही पक्षांच्या सभांना हजारोंची गर्दी होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर एकाच दिवसात पाच ते सहा जाहीर सभा घेतल्या. या सभांनाही लोकांची मोठी गर्दी होती.

मंगळवेढा तालुक्‍यातील बोराळे गावात तर अजित पवारांच्या सभेला उपस्थित असलेल्या आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी दोघे चक्क व्यासपीठावर उपस्थित होते. या धक्कादायक घटनेनंतरही कोणी फारसे मनावर घेतले नाही. निवडणूक संपताच आता दोन्ही तालुक्‍यांत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत मंगळवेढा तालुक्‍यात 34 नवीन रुग्णांची भर पडली आहे तर पंढरपूर तालुक्‍यात तब्बल 212 नवे रुग्ण वाढले आहेत. याच दरम्यान प्राचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे, अमोल मिटकरी, भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

निवडणूक प्रचार काळात मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग वाढल्याने दोन्ही तालुक्‍यांत सुमारे 1 हजार 872 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातच आता ऑक्‍सिजन, बेड आणि रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन मिळत नसल्याने रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील वाढती कोरोना रुग्णसंख्या ही चिंताजनक असून, सोलापूर जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण लसींपैकी 50 टक्के लसी पंढरपूर- मंगळवेढा तालुक्‍यातील लोकांसाठी द्याव्यात, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

प्रचारा दरम्यानच्या गर्दीमुळे कोरोना वाढीचा धोका संभवू शकतो, ही बाब माध्यम प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्या वेळी या दोन्ही नेत्यांनी कोरोना वाढला तर आम्ही जबाबदारी घेऊ, असे सांगितले होते. जयंत पाटील यांनी तर चक्क जाहीर सभेत, जगातून कोरोना पळून गेला आहे, मीही आता मास्क काढून बोलतो, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्यावर नंतर टीका झाली. त्यानंतर त्यांनी आपण उपरोधात्मक बोललो होतो, अशी सावध प्रतिक्रिया दिली.

निवडणूक काळात जी भीती होती, तीच आता समोर दिसू लागली आहे. मतदारसंघातील अनेक गावांमध्ये दररोज रुग्णसंख्या वाढू लागली आहे. याचा ताण आता

स्थानिक प्रशासनावर आला आहे. त्यातच रुग्णांना बेड आणि औषधोपचार वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्‍यात आला आहे. नेत्यांची निवडणूक झाली, आता कोरोना संकटाचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घर करू लागला आहे.

loading image