esakal | पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाइन ! कोरोनामुळे विद्यापीठाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur University

पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाइन ! कोरोनामुळे विद्यापीठाचा निर्णय

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

भावी संशोधकांना आता घरबसल्या परीक्षा देता येणार आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर पीएचडी (PhD) प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन घेण्याचा निर्णय पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) घेतला आहे. यामुळे भावी संशोधकांना आता घरबसल्या परीक्षा देता येणार आहे. येत्या 16 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाकडून सुरू आहे. (Due to Corona, Solapur University decided to take the PhD exam online)

हेही वाचा: कॉंग्रेसमुळेच होतेय भाजपचे मिशन लोटस पूर्ण : फारुख शाब्दी

विद्यापीठाची आठवी पेट (पीएचडी प्रवेश परीक्षा) (PhD entrance exam) ऑनलाइन घेतली जाणार आहे. कोरोनामुळे भावी संशोधकांना ऑफलाइन (कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन) परीक्षा देणे धोकादायक समजले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. साधारणपणे विविध अभ्यासक्रमांच्या 650 जागा आहेत. त्यासाठी अंदाजित अडीच हजार अर्ज येतील, असा विश्‍वास विद्यापीठाने व्यक्‍त केला आहे. या परीक्षेची जबाबदारी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पुण्यातील संस्थेकडे दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत विद्यापीठाने आतापर्यंत पदवी व पदविकाच्या चार परीक्षा ऑनलाइन घेतल्या आहेत. याच धर्तीवर आता पीएचडीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाइन घेतली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही परीक्षा होणार असून भावी संशोधकांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचीही निवड निकषांनुसारच केली जाणार आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, प्राध्यापकांची अनेक पदे रिक्‍त असल्याने एकाच मार्गदर्शक प्राध्यापकास वाढीव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लागेल, अशीही चर्चा आहे.

हेही वाचा: आठवी ते बारावीची भरणार ऑफलाइन शाळा ! शिक्षकांना राहावे लागणार गावातच

ठळक बाबी...

  • सहयोगी प्राध्यापकांकडे असणार प्रत्येकी चार संशोधक विद्यार्थी

  • असोसिएट प्राध्यापकांकडे असणार प्रत्येकी सहा संशोधकांची जबाबदारी

  • प्राध्यापक करणार प्रत्येकी आठ संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  • पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम शिकविण्याचा अनुभव असलेल्यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्‍ती

  • पीएचडी होऊन दोन वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्यांवरही असेल मार्गदर्शकाची जबाबदारी

  • पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे आहेत दोनशेहून अधिक मार्गदर्शक

कोरोनामुळे यंदा पीएचडी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी कुलगुरू व प्र-कुलगुरू यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात ही परीक्षा होईल.

- डॉ. विकास कदम, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

loading image