esakal | आमदार निधीला आचारसंहितेचा अडथळा ! राज्याच्या तिजोरीत खडखडाट; चारऐवजी दोन कोटीच मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Fund

आमदार निधीला आचारसंहितेचा अडथळा ! राज्याच्या तिजोरीत खडखडाट; चारऐवजी दोन कोटीच मिळणार

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली आहे. 2 मे रोजी मतमोजणी होणार असून, निवडणुकीची जनरल आचारसंहिता त्यानंतर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून आमदार निधी मिळणार आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने एक कोटीप्रमाणे दोन टप्प्यात आमदार निधी मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 13 पैकी पाच आमदारांनी कोरोनासंबंधित उपाययोजनांसाठी निधी देऊ केला आहे.

आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी वित्तमंत्री अजित पवार यांनी प्रत्येकी चार कोटींचा निधी दरवर्षी देण्याची घोषणा केली. मात्र, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने तूर्तास तो निर्णय गुंडाळून ठेवण्यात आला. आता प्रत्येकी दोन कोटींचा निधी दिला जात असून तोही दोन टप्प्यांत वितरित केला जात आहे. त्यातील एक कोटीचा निधी कोरोना काळात आवश्‍यक त्या उपाययोजनांसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन विधान परिषदेचे आमदार व विधानसभेचे 11 आमदार आहेत. त्यातील आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे व आमदार प्रणिती शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि राम सातपुते यांनी त्यांच्या निधीतून कामे सुचविली आहेत.

हेही वाचा: लसीकरण केंद्रावर नको गर्दी ! घरी बसूनच करा "अशी' ऑनलाइन नोंदणी

आमदार आदर्श ग्राम योजना बंद

केंद्र सरकारने आदर्श संसद ग्राम योजना सुरू केली असून प्रत्येक खासदाराला दरवर्षी त्यांच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याच्या विकासासाठी निधी दिला जातो. या धर्तीवर तत्कालीन सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरू केली. या योजनेतून आमदारांना दरवर्षी दोन कोटींचा निधी देण्यात आला. मात्र, महाविकास आघाडी सरकारने त्यासंदर्भात निर्णय घेतला नसल्याने अद्याप कोणत्याच आमदारांनी गाव निवडलेले नाही. आता आमदारांना केवळ त्यांच्या संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी दरवर्षी चार कोटींचा निधी देण्याचा निर्णय झाला. मात्र, राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने प्रत्येक आमदाराला आता दोन कोटींचाच निधी दिला जाणार आहे.

loading image