esakal | लसीकरण केंद्रावर नको गर्दी ! घरी बसूनच करा "अशी' ऑनलाइन नोंदणी

बोलून बातमी शोधा

Vaccination
लसीकरण केंद्रावर नको गर्दी ! घरी बसूनच करा "अशी' ऑनलाइन नोंदणी
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधित लस 18 ते 44 वयोगटातील व्यक्‍तींना टोचण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी https://selfregistration.cowin.gov.in/ या संकेतस्थळावरून नोंदणी करता येणार आहे.

या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागणार आहे. मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे. Gender सिलेक्‍ट केल्यानंतर जन्म वर्ष टाकावे लागणार आहे. पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला लसीकरणाची तारीख येईल. तर पहिला मेसेज रेफरन्स lD लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे. तर दुसरा मेसेज कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे, याची माहिती देईल.

हेही वाचा: लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद

शहरात कोव्हिड लसींचा तुटवडा असून महापालिकेने शासनाकडे अडीच लाख लसींची मागणी केली आहे. लस उपलब्ध होताच या विषयीची माहिती महापालिका नागरिकांना कळवणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. आयुक्तांनी सांगितले की, शहर परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेऊन केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाकडून लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान केली जाईल. त्या पद्धतीने महापालिकेमार्फत शहर आणि परिसरातील केंद्रांवर लसीकरण होणे अपेक्षित आहे. पण, लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची आरोग्य केंद्रांवर गर्दी होत आहे. तरी नागरिकांनी आरोग्य केंद्रात गर्दी करू नये. महापालिकेने कळविल्यानंतरच नागरिकांनी केंद्रावर जावे, असे आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा: मेंढरं राखणारा, ऊसतोड करणारा लोटेवाडीचा आबा "आयईएस'मध्ये देशात 21 वा

शहरात लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली आहे. 45 वर्षांवरील व्यक्‍ती लसीकरण केंद्रांवर हेलपाटे मारू लागले आहेत. मात्र, सध्या पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याने शहरातील बहुतेक केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लस टोचून घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीची मागणी वाढली असतानाही पुरेशा प्रमाणात लस मिळत नाही. महापालिका आयुक्‍तांनी सर्वांनाच लस टोचून घेण्यापूर्वी स्वत: नोंदणी करावी, अन्यथा लस मिळणार नाही, असा फतवा काढला. आता नोंदणी करूनही लस मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर आता 1 मेपासून शहर- जिल्ह्यात काय परिस्थिती राहणार, याचा विचार करायला नको, असे अधिकारी सांगू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा व महापालिका प्रशासनाने लस मिळावी म्हणून पाठपुरावा सुरू केला आहे.