
सोलापूर : शाळेत ये-जा करणाऱ्या लहान मुलांना शिवीगाळ करणाऱ्या पूनम विष्णू मंडले हिला रामलिंग मंडले यांनी समजावून सांगितले. त्याचा राग मनात धरून पूनमने रडत रडत माहेरच्यांना ही बाब सांगितली आणि लगेच त्याच रात्री तिचे दोन भाऊ, मावस भाऊ व आई हे सगळेजण मुलीच्या सासरी अर्धनारीत (ता. मोहोळ) आले. त्यांनी ‘रामलिंग कुठयं म्हणत’ त्यांना घराबाहेर काढून मारहाण सुरू केली. तलवारीचा वार चुकविताना तो हातावर बसला आणि रामलिंग मंडले यांचा हात मनगटापासूनच तुटला. या गुन्ह्यात आठ जणांविरुद्ध कामती पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी संशयितांना जेरबंद केले असून सध्या ते तुरुंगातच आहेत.