esakal | माळशिरस पंचायत समिती उपसभापती निवडणूक अचानक रद्द ! सदस्यांची आदेशाबाबत नाराजी

बोलून बातमी शोधा

Malshiras

माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

माळशिरस पंचायत समिती उपसभापती निवडणूक अचानक रद्द ! सदस्यांची आदेशाबाबत नाराजी

sakal_logo
By
गहिनीनाथ वाघंबरे

माळशिरस (सोलापूर) : माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

उपसभापती अर्जुनसिंह मोहिते- पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर आज गुरुवारी प्रशासनाच्या वतीने नवीन उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. तहसील कार्यालयाकडून पंचायत समिती कार्यालयाला याबाबत कळवण्यात आले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी या निवडीबाबत पंचायत समितीच्या सदस्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. उपसभापतीच्या निवडीकडे संपूर्ण माळशिरस तालुक्‍याचे लक्ष लागले होते. परंतु अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाला उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश आले. तहसील कार्यालयाकडून पंचायत समिती कार्यालयाला निवडणूक रद्द करण्याच्या सूचना आल्याने पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यासह तालुक्‍यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत उपस्थितांच्या सुरक्षिततेचा विचार करता सद्य:स्थितीत उपसभापती पदाची निवड प्रक्रिया तूर्तास घेता येणार नाही, असा आदेश माळशिरस तहसील कार्यालयाला दिला. याबाबत पंचायत समितीच्या सदस्यांनी पत्रकारांजवळ नाराजी व्यक्त केली. 

मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कोरोनाचा प्रादुर्भाव नाही का?
माळशिरसच्या शेजारच्या तालुक्‍यात पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुमारे तीन- साडेतीन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही का? माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी फक्त 22 सदस्य मतदान करणार होते. कोरोनाचे नियम पाळून आम्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली असती. मग जिल्हाधिकाऱ्यांनी असा दुजाभाव का केला? त्यांचा हा अजब कारभार सदस्यांच्या घटनेने दिलेल्या हक्कावर गदा आणणारा असल्याच्या प्रतिक्रिया अनेक सदस्यांनी व्यक्त केल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र