esakal | आशादायक ! पंढरपूर तालुक्‍यातील 11 गावे कोरोनामुक्त ! प्रशासनाच्या प्रयत्नांना यश
sakal

बोलून बातमी शोधा

Corona free

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठी जीवित हानी झाली. यामध्ये तालुक्‍यातील प्रमुख राजकीय नेत्यांचे अकाली निधन झाले. यामध्ये तालुक्‍यातील राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे.

आशादायक ! पंढरपूर तालुक्‍यातील 11 गावे झाली कोरोनामुक्त

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : सततच्या वाढत्या कोरोना (Covid-19) रुग्ण संख्येमुळे मागील सहा महिन्यांपासून जीव मुठीत धरून बसलेल्या पंढरपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यातील तब्बल 11 गावे कोरोनामुक्त (Coronafree Villages)) झाली आहेत. तर 20 गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे केलेल्या विविध उपाययोजनांमुळे हे यश आले आहे. (11 villages in Pandharpur taluka became corona free)

हेही वाचा: बार्शीत आढळलेला म्युकरमायकोसिस बुरशीच्या दोन प्रजातींचा! तज्ज्ञांचे संशोधन

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचे संकट घोंगावत आहे. सुरवातीला तालुक्‍यातील पहिला रुग्ण उपरी गावात आढळून आला होता. त्याच्यावर योग्य उपचार केल्यानंतर तो बरा देखील झाला. त्यानंतर मागील दीड वर्षात (काही गावांचा अपवाद वगळता) तालुक्‍यातील बहुतांश गावांत कोरोना पोचला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठी जीवित हानी झाली. यामध्ये तालुक्‍यातील प्रमुख राजकीय नेत्यांचे अकाली निधन झाले. यामध्ये तालुक्‍यातील राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: खत विक्रेत्यांना दणका ! जिल्ह्यातील 12 खत दुकानांचा परवाना निलंबित

मागील दोन महिन्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग तिप्पट झाला होता. अनेक गावांमध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्ण वाढले होते. अशा संकट काळात वैद्यकीय सेवाही अपुऱ्या पडल्या. ऑक्‍सिजन आणि वैद्यकीय उपचार वेळेवर न मिळल्याने अनेकांचे प्राण गेले. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांचा कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी येथील प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी एकमेकांच्या हातात हात घालून प्रसंगी जीवावर उधार होऊन शहर व तालुक्‍यातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तीन ते चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर तालुक्‍यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहर व तालुक्‍यातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आजअखेर पंढरपूर तालुक्‍यातील अजनसोड, बादलकोट, तरटगाव, करोळे, कान्हापुरी, देवडे, केसकरवाडी, शेंडगेवाडी, वाडीकुरोली, चिंचुबे, कोंडारकी ही 11 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर नेमतवाडी, तरटगाव, तनाळी (एक रुग्णसंख्या) नेपतगाव, सिद्धेवाडी, लोणारवाडी, कौठाळी, चिलाईवाडी, मेंढापूर, उंबरे (दोन रुग्णसंख्या) पुळूजवाडी, एकलासपूर, सुपली, नांदोरे, पेहे, जळोली, बार्डी (तीन रुग्णसंख्या), नळी, शेटफळ, बाभूळगाव (चार रुग्णसंख्या) आदी 20 गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. अन्य गावांत देखील कोरोना रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.

मागील सहा महिन्यांपासून पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. अशा परिस्थितीमध्ये प्रशासकीय व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध गावांत कोरोना उपयायोजना करून रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी तालुक्‍यातील 11 गावे कोरोनामुक्त झाली आहेत तर 20 गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. अधिकारी व स्थानिक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोना रुग्ण वाढ नियंत्रणात आणणे शक्‍य झाले आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा. नियमांचे पालन केले तर कोरोनाला दूर ठेवणे शक्‍य आहे. किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष न करता चाचणी करून उपचार घेणे आवश्‍यक आहे.

- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर