esakal | खत विक्रेत्यांना दणका ! जिल्ह्यातील 12 खत दुकानांचा परवाना निलंबित
sakal

बोलून बातमी शोधा

fertilizer shop

खतावरील अनुदान वाढले असतानाही शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दराने खत विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील 12 दुकानांचा परवाना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी रद्द केला आहे.

खत विक्रेत्यांना दणका ! जिल्ह्यातील 12 खत दुकानांचा परवाना निलंबित

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : खतावरील अनुदान वाढले असतानाही शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दराने खत (fertilizer) विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील 12 दुकानांचा परवाना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने (District Superintendent Agriculture Officer Ravindra Mane) यांनी रद्द केला आहे. या कारवाईमुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले तर खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (License of twelve fertilizer shops in Solapur district suspended)

हेही वाचा: तथागत गौतम बुद्धांची शिकवण आणि आपले आचरण !

सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. सध्या जिल्ह्यातील 3 लाख 75 हजार हेक्‍टरवर तूर, सोयाबीन, उडीद, मूग, मका, बाजरी या पिकांबरोबरच उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता खरीप हंगामात बरेच शेतकरी खत दुकानदारांकडे खतांची मागणी करीत आहेत. तत्पूर्वी, रासायनिक खतांवरील अनुदान केंद्र सरकारने वाढवले आहे. असे असतानाही खत दुकानदार शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दराने खतांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारीवरून शेतकऱ्यांना खत दुकानदाराने दिलेली पावती पडताळून संबंधित खत विक्री दुकानांवर परवाना निलंबनाची कारवाई रवींद्र माने यांनी केली आहे.

हेही वाचा: जिल्ह्यातील "या' 137 गावांनी उडवली प्रशासनाची झोप !

पॉस मशिनच्या माध्यमातून युरिया शेतकऱ्यांना दिला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक घेतला जातो आणि त्याची ऑनलाइन नोंद होते. परंतु, काही ठिकाणी शेतकऱ्यांना युरिया देऊनही त्याची नोंद पॉस मशिनवर घेतली जात नाही, असेही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात येणाऱ्या युरियाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. या प्रकाराची गंभीर दखल घेत कृषी सेवा केंद्राची तपासणी करून त्यांच्यावर कारवाईचे निर्देश रवींद्र माने यांनी सर्व कृषी निरीक्षकांना दिले आहेत. त्यासाठी तालुकानिहाय भरारी पथके स्थापन केली असून त्यांच्यावर जिल्हा पथकाच्या माध्यमातून वॉच ठेवला जात आहे. तक्रारदार शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अशोक मोरे (7083774100) आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर बारवकर (8788670050) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहनही रवींद्र माने यांनी केले आहे.

केंद्र सरकारने वाढवलेल्या अनुदानानुसार खत विक्री न करता जुन्याच दराने खत विक्री करणाऱ्या खत दुकानदारांची पक्की पावती शेतकऱ्यांनी जवळ ठेवावी. त्यानुसार तक्रार प्राप्त झाल्यास त्या दुकानांचा परवाना निलंबित केला जाईल.

- रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

"या' दुकानांचा परवाना निलंबित

मल्लिकार्जुन खत विक्री केंद्र बोरगाव, पद्मावती ऍग्रो एजन्सी, राजेश्वरी कृषी भांडार, दुधनी, शहा कृषी भांडार, करजगी (सर्व दुकाने ता. अक्कलकोट), गजानन कृषी केंद्र, कंदलगाव, गणेश कृषी केंद्र, मंद्रूप, लक्ष्मी कृषी केंद्र, सादेपूर, न्यू उत्कर्ष कृषी भांडार, मंद्रूप (सर्व दुकाने ता. दक्षिण सोलापूर), माळसिद्ध कृषी केंद्र, तेलगाव, फताटे उद्योग केंद्र (ता. उत्तर सोलापूर), राहुल कृषी केंद्र, टेंभुर्णी (ता. माढा), झुआरी फार्म हब महाळुंग (ता. माळशिरस) या 12 खत दुकानदारांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी परवाना निलंबनाची कारवाई केली आहे.