esakal | भोसे येथील संपूर्ण बाजारपेठ बुधवारपासून पाच दिवस बंद ! आदेशाचा भंग केल्यास दहा हजारांचा दंड

बोलून बातमी शोधा

Lockdown

तालुक्‍यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तसेच पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उडत असलेला प्रचार सभांचा धुरळा यामुळे बाजारपेठेत होत असलेली प्रचंड गर्दी तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांची गर्दी लक्षात घेता, भोसे ग्रामस्तरीय समितीने 14 ते 18 एप्रिलपर्यंत सलग पाच दिवस भोसे येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

भोसे येथील संपूर्ण बाजारपेठ बुधवारपासून पाच दिवस बंद ! आदेशाचा भंग केल्यास दहा हजारांचा दंड
sakal_logo
By
गुरुदेव स्वामी

भोसे (सोलापूर) : तालुक्‍यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तसेच पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उडत असलेला विविध पक्षांच्या प्रचार सभांचा धुरळा यामुळे बाजारपेठेत होत असलेली प्रचंड गर्दी तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांची गर्दी लक्षात घेता, भोसे ग्रामस्तरीय समितीने 14 ते 18 एप्रिलपर्यंत सलग पाच दिवस भोसे येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. 

मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिण भागातील भोसे हे व्यापारी पेठेचे केंद्र असल्याने या गावामध्ये आसपासच्या हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी, शिरनांदगी, रड्डे, मानेवाडी व महमदाबाद आदी आठ - दहा खेड्यांतील ग्राहक व्यापारी दररोज विविध कामांसाठी तसेच बॅंकांच्या कामासाठी येत असतात. त्यामुळे बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

त्यातच सध्या सुरू असलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने वाढलेल्या गर्दीमुळे भोसे आणि आसपासच्या परिसरात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे भोसे येथील ग्रामस्तरीय समितीने आज (मंगळवारी) सकाळी तातडीची बैठक घेऊन 14 एप्रिल पासून 18 एप्रिलपर्यंत सलग पाच दिवस बाजार पेठ बंद बाजारपेठ ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या काळात फक्त दवाखाने आणि मेडिकल्स सुरू राहतील. या व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद राहतील, असे आदेश काढले आहेत. या सूचनांचे पालन जे व्यापारी करणार नाहीत त्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा आदेश ग्रामस्तरीय समितीने काढला आहे. 

दरम्यान, या काळात 17 एप्रिल रोजी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान होणार असले तरी त्या दिवशी गावातील कुठलीही दुकाने चालू राहणार नाहीत. बाजारपेठ बंद ठेवून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन ग्रामस्तरीय समितीने सर्व ग्रामस्थांना केले आहे: 

या वेळी सरपंच सुनीता ढोणे, पंचायत समिती सदस्य सूर्यकांत ढोणे, उपसरपंच बाळासाहेब काकडे, ग्रामविकास अधिकारी अविनाश मोरे, गाव कमगार तलाठी जयश्री कलोळे, कृषी पर्यवेक्षक राजकुमार ढेपे, डॉ. अप्पासाहेब निकम व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल