३० दिवसानंतरही विद्यापीठाचे ‘ऑनस्क्रिन’ निकाल नाहीत! २ लाखांपैकी ७६ हजार उत्तरपत्रिकांचेच स्कॅनिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur univercity
३० दिवसानंतरही विद्यापीठाचे ‘ऑनस्क्रिन’ निकाल नाहीत! २ लाखांपैकी ७६ हजार उत्तरपत्रिकांचेच स्कॅनिंग

३० दिवसानंतरही विद्यापीठाचे ‘ऑनस्क्रिन’ निकाल नाहीत! २ लाखांपैकी ७६ हजार उत्तरपत्रिकांचेच स्कॅनिंग

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमांचे निकाल ऑनस्क्रिन तयार करण्याचा निर्णय घेतला. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग व ऑनलाइन पद्धतीनेच त्याची तपासणी करणाऱ्या या प्रणालीमुळे निकाल वेळेत लागतील, असा विश्वास होता. पण, पेपर झाल्यानंतर ३० दिवसांत निकाल लागावा, असा नियम असतानाही सध्या तेवढा कालावधी पूर्ण होऊनही कोणत्याचे अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झालेला नाही, हे विशेष.

विद्यापीठाची सत्र परीक्षा २३ जानेवारीपासून सुरु झाली. परीक्षा सुरु झाल्यानंतर २ फेब्रुवारीपासून विद्यापीठ व उच्च महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकत विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले. त्यामुळे तीन दिवस पेपर रद्द करावे लागले.

आता ते पेपर पुढील आठवड्यात घेतले जाणार आहेत. त्यामुळे देखील निकालास विलंब लागणार आहे. दुसरीकडे ऑनस्क्रिन सेंटरवर जाऊन उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी प्राध्यापकांना वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे. सध्या दोन लाख उत्तरपत्रिकांपैकी केवळ ७६ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून आणखी सव्वालाख उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करावे लागणार आहे. ८५ ते १०० प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु आहे.

विद्यापीठाने वारंवार बजावून देखील पाच टक्के प्राध्यापक त्यांच्या सवडीने उत्तरपत्रिका तपासात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यांच्या मागे लागून उत्तरपत्रिका तपासून घेतल्या जात आहेत, जेणेकरून निकाल वेळेत जाहीर होतील आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होणार नाही हा हेतू आहे.

काही दिवसांत निकाल जाहीर होतील

जिल्ह्यातील १७ केंद्रांवर सत्र परीक्षेचे ऑनस्क्रिन पेपर तपासणी सुरु आहे. काही दिवसांत बीएड, बीपीएड, एमएड, एमपीएडसह बी-टेक अंतिम वर्ष आणि इंजिनिअरिंग अंतिम वर्ष व इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरचा निकाल जाहीर होईल.

- डॉ. शिवकुमार गणपूर, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

‘त्या’ विद्यार्थ्यांची २८ मार्चला विशेष परीक्षा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी गेलेले विद्यार्थी आणि ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे हॉल तिकीट उशिराने मिळाले, त्या सर्व विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे यापूर्वी तसे लिखित स्वरूपात कळवले आहे. २८ मार्च रोजी त्यांची विशेष परीक्षा होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली.