पुणेरी सोलापूरकरांमध्ये 55 हजारांवर इंजिनिअर्स ! दरवर्षी सोलापुरातून बाहेर पडतात साडेचार हजार इंजिनिअर्स

Engineers
Engineers

सोलापूर : जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षणाला प्रारंभ झाला. त्यानंतर 1983 मध्ये डब्ल्यूआयटी तर 1998-99 मध्ये स्वेरी महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण सुरू झाले. 2006 ते 2010 या काळात जिल्ह्यात अभियांत्रिकी शिक्षणाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातून सुमारे 76 हजारांपर्यंत इंजिनिअर्स (अभियंते) शिक्षण घेऊन बाहेर पडले. मात्र, त्यातील 55 हजारांहून अधिक इंजिनिअर्स पुणेरी सोलापूरकर म्हणून आणि काही इंजिनिअर्स इतरत्र नोकरीनिमित्त स्थलांतरित झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर शहर - जिल्ह्यात एकूण 15 महाविद्यालये आहेत. त्यातील सात महाविद्यालये "बाटू'शी संलग्नित असून उर्वरित आठ महाविद्यालये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी कनेक्‍ट आहेत. पुणे, हैदराबाद, बंगळूर, मुंबई येथील कनेक्‍टिव्हिटी वाढली असून आता होटगी रोडवरील विमानसेवा पूवर्वत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सोलापूर हे उदयोन्मुख शहरांमध्ये समाविष्ट असून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराचा विकास होऊ लागला आहे. 

शहरात बोरामणीसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सकारात्मक आहे. आयटी इंडस्ट्री आणण्याचे प्रयत्न मागील कित्येक वर्षांपासून सुरू असतानाही अद्याप तो विषय मार्गी लागलेला नाही. प्रिसिजन, बालाजी अमाईन्स वगळता मोठमोठ्या कंपन्यांची संख्या अपेक्षित वाढलेली नाही. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास निश्‍चितपणे स्थलांतर थांबेल, असा विश्‍वास स्थलांतरित इंजिनिअर्स व्यक्‍त करीत आहेत. 

नवइंजिनिअर्स स्थलांतरणाची प्रमुख कारणे... 

  • मागील 15 वर्षांत जिल्ह्याचा अपेक्षित औद्योगिक विकास झालाच नाही 
  • सोलापुरातील उद्योगांमध्ये नवअभियंत्यांना मिळत नाही अपेक्षित नोकरी 
  • स्वप्नपूर्तीसाठी पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मिळत नाही अपेक्षित वेतन 
  • रेल्वे, महामार्गाची कनेक्‍टिव्हिटी वाढल्याने सोलापुरात राहूनही पुणे, मुंबईला जॉब करण्याची संधी 
  • स्थापत्य वगळता अन्य क्षेत्राच्या उद्योगांची सोलापूर शहर- जिल्ह्यात आहे कमतरता 

जिल्ह्यात औद्योगिक विकासाची मोठी संधी 

  • मेकॅनिकल, स्वॉफ्टवेअर, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍ससंबंधी उद्योग सुरू होण्याची गरज 
  • ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकणच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील जागेचा भाव तुलनेत खूपच कमी 
  • विमानसेवा सुरू झाल्यास जिल्ह्याची वाढेल आणखी कनेक्‍टिव्हिटी; रेल्वे, महामार्ग प्रवास सुखदायी व्हावा 
  • प्लेसमेंटमध्ये सोलापूर शहर- जिल्ह्यातील उद्योजकांनी घ्यावा अधिकाधिक सहभाग 
  • शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील अनुभवी, वजनदार व्यक्‍तींनी लावावा रेटा 

औद्योगिक विकासानंतर थांबेल स्थलांतर 
सोलापूरची कनेक्‍टिव्हिटी वाढली असून औद्योगिक विकासास मोठा वाव आहे. परंतु, जिल्ह्यात अपेक्षित औद्योगिक विकास न झाल्याने मागील काही वर्षांत जिल्ह्यातील हजारो नवअभियंते पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत. त्यांना थांबविण्याच्या दृष्टीने सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करून औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. 
- डॉ. शंकर नवले, 
अधिष्ठाता, माहिती व तंत्रज्ञान विभाग, सोलापूर विद्यापीठ 

इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, स्वॉफ्टवेअर इंडस्ट्रीची गरज 
मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांनंतर आता उद्योजकांची नजर सोलापूरकडे वळत आहे. त्याचा पुरेपूर लाभ घेऊन अपेक्षित औद्योगिक विकास झाल्यानंतर त्यांच्यासाठी कुशल मनुष्यबळ या ठिकाणीच उपलब्ध होईल. दरवर्षी साडेचार हजारांपर्यंत नवइंजिनिअर्स शिक्षण घेऊन बाहेर पडतात, मात्र त्यांना अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने ते सोलापूर सोडून जात आहेत. 
- डॉ. जे. बी. दफेदार, 
प्राचार्य, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com