पुन्हा आश्‍वासन खोटेच! हप्ते पाडण्याचा आदेश नसल्याने शेतीपंपाचे वीज कनेक्‍शन तोडणी सुरुच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara
हप्ते पाडण्याचा आदेश नसल्याने शेतीपंपाचे वीज कनेक्‍शन तोडणी सुरुच

पुन्हा खोटेच आश्‍वासन! हप्ते पाडण्याचा आदेश नसल्याने शेतीपंपाचे वीज कनेक्‍शन तोडणी सुरुच

सोलापूर : ऐन उन्हाळ्यात अडचणीतील शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन थकबाकीचे कारण पुढे करून तोडले जात आहे. त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सविस्तर चर्चा झाल्यानंतर कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज करून त्या थकबाकीचे हप्ते पाडून घेतल्यास त्याचे कनेक्‍शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. मात्र, अधिकाऱ्यांपर्यंत त्यासंदर्भातील लेखी आदेश आलेच नाहीत. त्यामुळे सप्टेंबर 2020 नंतरची संपूर्ण रक्‍कम न भरलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडण्याची कारवाई सुरूच आहे.

हेही वाचा: सोलापूर : तीन तालुके कोरोनामुक्‍त! शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर

मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी अवकाळी, अतिवृष्टी आणि कोरोना या संकटांचा सामना करतानाच राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला. तरीही, वीजेची थकबाकी भरली नाही म्हणून त्यांचे कनेक्‍शन तोडले जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेकांनी वीज तोडणीबद्दल अधिवेशनात आवाज उठविला. त्यावेळी ज्यांना संपूर्ण वीजबिल एकरकमी भरणे अशक्‍य आहे, त्या शेतकऱ्यांना हप्ते पाडून देऊन कारवाई थांबविली जात असल्याची माहिती उर्जामंत्र्यांनी दिली. परंतु, अधिवेशनातील उर्जामंत्र्यांची माहिती आणि शेतकऱ्यांच्या बांधावरील स्थिती खूपच वेगळी असल्याचे चित्र आहे. अधिकारी म्हणतात, मंत्री काहीही घोषणा करतात. पण, त्यांच्याकडून लेखी काहीतरी आम्हाला मिळाल्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच. उन्हाच्या तडाख्याने पीकांनी माना टाकायला सुरवात केली आहे. कारखान्यांकडून उसाला तोड येत नसल्याने शेतात ऊस जळू लागला आहे. अशा परिस्थितीत पिकाला पाणी द्यावे म्हटले तर लाईट नाही, अशी आवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

हेही वाचा: शिक्षकांची पगार 1 तारखेला नाहीच! बॅंकांचे हप्ते भरायची पंचाईत

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सप्टेंबर 2020 पासून जवळपास आठशे कोटींची थकबाकी झाली आहे. त्यांनी ती चालू वीजबिलाची रक्‍कम भरणे अपेक्षित आहे. सप्टेंबर 2020 पूर्वीच्या थकबाकीवर कृषी धोरण-2020 अंतर्गत सवलत दिली गेली आहे. 31 मार्चपूर्वी एकूण थकबाकीतील 35 टक्‍के रक्‍कम भरून त्यांनी थकबाकीमुक्‍त व्हावे, अन्यथा थकबाकीदारांना वीज मिळणार नाही.
- संतोष सांगळे, महावितरण, अधीक्षक अभियंता, सोलापूर

हेही वाचा: नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर! प्रणिती शिंदेंना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद?

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन
सोलापूर जिल्ह्यात कृषीपंपाचे तीन लाख 63 हजार ग्राहक असून त्यातील 12 हजार शेतकरी थकबाकीमुक्‍त आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील वीज बिल भरावे म्हणून तगादा लावला जात असून थकबाकीदारांचे कनेक्‍शन तोडले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस भिमराव बाळगे, जिल्हा संघटक रमेश हसापुरे व अभिराज शिंदे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले. थकबाकीचे हप्ते पाडून त्यांच्याकडून वीज बिल घ्यावे, कनेक्‍शन तोडणी त्वरीत थांबवावी, अशी मागणी केली.

Web Title: False Assurance Again As There Is No Order To Reduce The Installments The Power Connection Of The Agricultural Pump Continues To Be Cut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..