प्रणिती शिंदेंना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रणिती शिंदें
नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर! प्रणिती शिंदेंना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद?

नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर! प्रणिती शिंदेंना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद?

हेही वाचा: सोलापूर : नवीन चेअरमन म्हणाले वाशीतील जागा विकावीच लागेल

सोलापूर : कॉंग्रेसने 2009 पासून सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद दिले नाही. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद जिल्ह्यात वाढत असतानाच मोदी लाटेनंतर भाजपनेही चांगलाच जम बसविला आहे. त्यामुळे मित्रपक्ष व विरोधकांच्या तुलनेत आपली ताकद वाढण्यासाठी जिल्ह्याला मंत्रिपदाची गरज आहे. लोकसभेला दोनवेळा पराभव झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही राजकारणापासून अलिप्त होत आहेत. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदेंना मंत्रिपद दिल्यास शहर-जिल्ह्यातील कॉंग्रेसला निश्‍चितपणे बळ मिळेल, असा विश्‍वास पदाधिकाऱ्यांना आहे. शहर कॉंग्रेसने आमदार प्रणितींना मंत्रिपद द्यावे, असा ठराव करून तो पक्षश्रेष्ठीला पाठविला आहे. तर जिल्हा कॉंग्रेसनेही तसा ठराव केला आहे.

हेही वाचा: सोलापूर : महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार

महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला दहा कॅबिनेट व दोन राज्यमंत्रीपदे आहेत. अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर आता मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरु आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेत दिले होते. दरम्यान, मोदी लाटेतही आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला. त्यांनी विजयाची हॅट्रिक केली असून कार्याध्यक्ष व अनुसूचित जाती समितीचे कामकाज सांभाळताना त्यांनी राज्यभर दौरे करून लोकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा वाव आहे. पण, पक्षाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा हे विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभेची जागा गमवावी लागली. त्यामुळे आमदार प्रणितींना मंत्रिपद देण्याची खूप गरज आहे. पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपद व प्रदेश प्रवक्‍तेपद सोपविले आहे. मात्र, मंत्रिपद मिळाल्यास त्या निश्‍चितपणे कॉंग्रेसचे आमदार वाढविण्याचा प्रयत्न करतील, असा विश्‍वास पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. महाविकास आघाडीत आमदार प्रणिती शिंदे यांची वर्णी लागावी म्हणून त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण, पक्षश्रेष्ठींकडून पुढे निश्‍चितपणे संधी मिळेल, असा विश्‍वास आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखविला आणि पदाधिकारी गप्प बसले. आता महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीपूर्वी त्यांना मंत्रिपद मिळाल्यास निश्‍चितपणे कॉंग्रेसची ताकद वाढलेली दिसेल, अशी स्थिती आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रविवारी (ता. 13) सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: गोड उसाची कडू कहाणी! जगाच्या पोशिंद्याचीच उदरनिर्वाहासाठी धडपड

कोठेंच्या खांद्यावरून पालकमंत्र्यांचा निशाणा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कोठेंच्या माध्यमातून माजी महापौर ऍड. यु. एन. बेरिया यांनीही राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, प्रिया माने यादेखील कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या जाव्यात म्हणून जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांच्या जवळचे लोक वेगवेगळ्या पध्दतीचे अमिष दाखवून राष्ट्रवादीत घेऊन त्यांची ताकद कमी करण्याचा डाव आखला जात असल्याचे बोलले जात आहे. पण, स्वकीयांसह विरोधकांच्या चक्रव्युहाला भेदून कॉंग्रेसला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी आमदार प्रणितींना मंत्रिपद देण्याचा निर्णय मोठा निणार्यक ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.

Web Title: Nana Patole On Solapur Tourpraniti Shinde To Be The Minister Of State Or In The Cabinet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..