Farmer Strike : सोलापुरात भाजप तालुकाध्यक्षाच्या विरोधात शेतकरी कुटुंबाचे थंडी-वाऱ्यात कुडकुडत उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer family hunger strike against BJP taluk president Ganesh Chivete Solapur

Farmer Strike : सोलापुरात भाजप तालुकाध्यक्षाच्या विरोधात शेतकरी कुटुंबाचे थंडी-वाऱ्यात कुडकुडत उपोषण

सोलापूर : करमाळा तालुका भाजपचे अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या विरोधात सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील तीन दिवसांपासून एक कुटुंब थंडी-वाऱ्यात कुडकुडत उपोषणास बसले आहे. दरम्यान मागील तीन दिवसांपासून या उपोषणकर्त्यांची संबंधित यंत्रणेने अद्याप दखल घेतलेली नाही, आजवर या प्रकरणात संबंधित यंत्रणांना अनेक वेळा निवेदने, तक्रारी देऊनदेखील न्याय मिळालेला नाही, उपोषण करूनदेखील न्याय मिळतो का नाही? या चिंतेत हे कुटुंबीय उपोषणस्थळी बसले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे न्याय मिळण्यासाठी उपोषणास बसलेल्या दोघांचा उपोषणस्थळी मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असतानाच, संबंधित यंत्रणेकडून या कुटुंबीयांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष होत आहे, भविष्यात उपोषणातून काही बरे-वाईट झाले, तर त्याची जबाबदारी कोणी घेणार हा 'कळी' चा मुद्दा आहे.

करमाळा तालुक्यातील सोगाव (प.) इथले एक शेतकरी कुटुंब मागील काही दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण करीत आहे. उपोषणकर्त्यांमध्ये पांडुरंग नामदेव पवार, संजना पांडुरंग पवार, अक्षय पांडुरंग पवार व ज्ञानेश्वर पांडुरंग पवार यांचा समावेश आहे. भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या विरोधात हे उपोषण सुरू आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचा शेती हा व्यवसाय असून दूध व्यवसाय हा जोड धंदा आहे. दररोज साधारण 600 ते 700 लिटर दूध जी एन सी मिल्क कलेक्शन करमाळा येथील दूध डेरी मालक गणेश चिमटे यांच्या डेअरीला घालत होतो.

आमच्याकडे 62 गाई होत्या, मात्र देशावर कोरोना सारखी महामारी चालून आली त्यामुळे दुग्ध व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. दर घसरन झाल्यामुळे गायीचा चारा व खुराक याचा ताळमेळ बसत नव्हता. त्यावेळी गणेश चिमटे यांना वारंवार मागूनही दुधाच्या पगारातून खुराक व चाऱ्यासाठी पैसा देत नसत अशातच चिवटे हे आमच्या घरी येऊन दमदाटी करत असे एके दिवशी तर माझ्या पैशाची व्याजासहित परतफेड करा नाहीतर तुमची शेत जमीन माझ्या नावावर करा तुमच्या गाई खडकी येथील गोठ्यावर नेऊन संगोपन करेल अशी दमबाजी केली त्यानंतर आमच्या 37 घाई नेण्यात आल्या त्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहे.

चिवटे यांच्या विरोधात 7 डिसेंबर 2021 रोजी करमाळा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी आमची दखल घेतली नाही. लगेच दुसऱ्या दिवशी आठ डिसेंबर 2021 रोजी ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडेही तक्रारी अर्ज दिला तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही. एक वर्षापासून कोणीही दखल घेत नाही म्हणून शेवटी पवार कुटुंबीय सोलापूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. आमच्या 37 गाई परत मिळाव्यात व झालेले एक वर्षाची नुकसान मिळावे अशी मागणी आहे. तथापि, या प्रकरणात करमाळा भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांना संपर्क साधून बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.