esakal | झेंडू फुलशेतीतून दुष्काळी लक्ष्मीनगरचा शेतकरी झाला लखपती | Agricultural News
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडू फुलशेतीतून दुष्काळी लक्ष्मीनगरचा शेतकरी झाला लखपती!

कोरोना संकट काळात आर्थिकदृष्ट्या कुमकुवत झालेल्या धनाजी बाड या तरुण शेतकऱ्याला तर झेंडू फुलशेतीने लखपती बनवले आहे.

झेंडू फुलशेतीतून दुष्काळी लक्ष्मीनगरचा शेतकरी झाला लखपती!

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) खडतर दोन वर्षांनंतर भाजीपाला (Vegetables) आणि फुलांना (Flowers) चांगले दिवस आले आहेत. दसरा सणाच्या तोंडावर झेंडू फुलांना (Marigold flowers) मागणी वाढल्याने दरातही घसघशीत वाढ झाली आहे. दुष्काळी सांगोला तालुक्‍यातील (Sangola) अनेक शेतकऱ्यांना झेंडू फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे. कोरोना संकट काळात आर्थिकदृष्ट्या कुमकुवत झालेल्या धनाजी बाड (Dhanaji Baad) या तरुण शेतकऱ्याला तर झेंडू फुलशेतीने लखपती बनवले आहे. पाच एकर झेंडू शेतीतून त्यांना 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी त्यांना आशा आहे.

हेही वाचा: सेंद्रिय गुळाचा 'यादवबाग' ब्रॅंड! मारापूरच्या हरिभाऊ यादवांचा प्रयोग

पिढ्यान्‌पिढ्या दुष्काळाशी लढणाऱ्या सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत उपलब्ध पाण्यावर भाजीपाला आणि फुलांचे मळे फुलवले आहेत. लक्ष्मीनगर येथील शेतकरी धनाजी बाड यांनी पाच एकर क्षेत्रावर झेंडूची लागवड केली आहे. बाड यांनी खडकाळ माळरानावर ऑगस्ट महिन्यामध्ये ठिबक सिंचनावर झेंडूची लागवड केली आहे. लागवडीपूर्वी शेणखत आणि त्यानंतर रासायनिक खतांची योग्य मात्रा दिल्याने झेंडूची जोमदार वाढ झाली आहे. लागवडीपासून तीन महिन्यांनंतर फुलांची तोडणी सुरू झाली आहे. नवरात्र, दसरा सणामुळे झेंडूला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरही चांगला मिळत आहे.

आतापर्यंत पाच टन झेंडूची मुंबईच्या मार्केटमध्ये प्रती टन 50 हजार रुपये दराने विक्री केली आहे. दिवाळीपर्यंत एकरी 15 टनाप्रमाणे सुमारे 75 टन झेंडूचे उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे. दर टिकून राहिले तर पाच एकर झेंडू फुलशेतीतून 30 ते 35 लाखांचे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे. फुलशेतीसाठी त्यांना 10 लाख रुपयांचा खर्च आला आहे. खर्च वजा जाता केवळ चार महिन्यांत फुलशेतीतून 25 लाखांचा नफा मिळेल अशी अपेक्षा फुलशेतीचे व्यवस्थापन पाहणारे कालिदास बजबवळकर यांना आहे.

loading image
go to top