कारखाने जोमात मात्र शेतकरी कोमात ! ऊसतोड मजूर, मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

Sugar Cutter
Sugar Cutter

केत्तूर (सोलापूर) : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगाने पुढे सरकत आहे. गतवर्षी सगळीकडेच चांगला पाऊस झाल्याने उसाचे जास्त उत्पादन झाल्याचे चित्र असले तरी, यावर्षी साखर कारखान्यांकडे ऊसतोड यंत्रणा कमी असल्याने याचा फटका ऊसतोड मजूर घेत आहेत. ते अक्षरशः शेतकऱ्यांची आर्थिक लूटच करीत असल्याचे चित्र आहे व नाइलाजाने शेतकरीही मूग गिळून गप्प आहेत. 

अशा परिस्थितीत कारखान्याशी संबंधित पुढारी व मोठे शेतकरी यांच्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची मात्र गळचेपी होत आहे. सगळी यंत्रणा मोठ्या शेतकऱ्यांकडे ऊसतोड करीत असल्याने लहान शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नाही. त्यामुळे त्यांची मात्र हेळसांड होत आहे. 

आपल्याला ऊसतोड मिळावी म्हणून शेतकरी साखर कारखान्यांकडे हेलपाटे मारून बेजार होत आहेत. आज या, उद्या या म्हणून कारखाना प्रशासन त्यांना पुन्हा माघारी पिटाळत आहे. जरी ऊसतोड मिळाली तरी एका खेपेला 1800 ते 2000 रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात असून, ऊसतोड मजूर, ड्रायव्हर, मुकादम यांना मासे, मटण याच्या पार्ट्याही द्याव्या लागत आहेत. यापूर्वीच वाढे बांधण्यासाठी टनाला 80 ते 100 रुपये ऊसतोड मजुरांना द्यावे लागत होते. शेतकऱ्यांना या उसाकडे बघण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. 

गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटले तरी देखील आडसाली उसाला अद्याप ऊसतोड मिळत नाही. 17 ते 19 महिने झाले तरी ऊसतोड नसल्याने या उसाच्या साखर उत्पादनात घट होणार आहे. वरचेवर उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. काही ठिकाणी वाढत्या उन्हामुळे आडसाली ऊस वाळून चालला आहे. 

सध्या ऊसतोड मजूर, चालक, मुकादम यांच्याकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे सामान्य शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. ऊसतोड हवी असेल तर ट्रॅक्‍टर मालक, चालक, ऊसतोड मुकादम तसेच ऊसतोड मजुरांना गाठावे लागत आहे व ऊसतोड मजुरांची उठाठेव हांजी- हांजी करताना नाकीनऊ येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी मात्र पुरता बेजार व घायाळ होत आहे. कारखाना प्रशासन मात्र याकडे बघ्याची भूमिका घेत आहे, हे विशेष. 

ऊसतोडणी यंत्रणा अपुरी मात्र गाळप जोमात 
कारखाना सुरू झाल्यापासून सर्वच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असून, कारखान्यांचे गाळप मात्र व्यवस्थित व सुरळीत सुरू आहे. कारखाने जोमात सुरू असले तरी अल्पभूधारक शेतकरी मात्र "कोमात' चालले आहेत. 

उजनी लाभक्षेत्र परिसरातील बहुतांश ऊस तोडणीअभावी अजूनही शेतातच उभा आहे. आता ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात वाढत्या कोरोनाचा फटका बसतो की काय म्हणून आपला ऊस गाळप व्हावा यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. 

ऊसतोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने मजुरांची कमतरता होती, त्याचा फटका आता जाणवू लागला आहे. त्यातच कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने संकटात मात्र वाढ झाली आहे. ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवताना ऊस उत्पादक शेतकरी त्यामुळे हैराण झाला आहे. गतवर्षी झालेल्या जोरदार पावसाचा उसाच्या पिकाला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. एकरी टनेजमध्ये वाढ झाली आहे. सध्या ज्यादा पैसे देऊनही तोड मिळत नसल्याने कारखाना कर्मचारी व शेतकरी यांच्यात वादावादीचे प्रकारही होत आहेत. 

साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सद्य:स्थिती 
उजनी लाभक्षेत्रातील ऊस पट्ट्यात सध्या बारामती ऍग्रो, शेटफळ (ता. इंदापूर), अंबालिका शुगर, बारडगाव (ता. कर्जत), मकाई सहकारी साखर कारखाना, भिलारवाडी (ता. करमाळा), कमलाई शुगर, पांडे (ता. करमाळा) याबरोबरच श्रीराम शुगर, हळगाव (ता. जामखेड) व माढेश्वरी शुगर, माढा हे कारखाने ऊसतोड करीत आहेत तर भैरवनाथ शुगर, विहाळ (ता. करमाळा) ने आपला गाळप हंगाम संपवला आहे. शिल्लक राहिलेला ऊस पाहता गाळप हंगाम एप्रिल किंवा मे अखेरपर्यंत लांबण्याचे चित्र दिसत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com