esakal | सोलापूरकरांना प्रतीक्षा नियमित पाण्याची ! समांतर जलवाहिनीला शेतकऱ्यांचा अडथळा; कामाला लागणार विलंब

बोलून बातमी शोधा

Jalwahini.

सोलापूर-उजनी अशी 110 किलोमीटरची समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून फेब्रुवारी 2022 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, कधी निधीचा तर कधी शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे. 

सोलापूरकरांना प्रतीक्षा नियमित पाण्याची ! समांतर जलवाहिनीला शेतकऱ्यांचा अडथळा; कामाला लागणार विलंब

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर-उजनी अशी 110 किलोमीटरची समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून फेब्रुवारी 2022 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, कधी निधीचा तर कधी शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे. उत्तर सोलापूर, मोहोळ आणि माढा तालुक्‍यातील 117 शेतकऱ्यांपैकी 90 जणांनी हरकत घेतली असून त्यावर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे शहरवासीयांना सुरळीत पाण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

एनटीपीसी, स्मार्ट सिटी आणि महापालिकेकडून समांतर जलवाहिनीसाठी निधी मिळणार आहे. आता एनटीपीसीकडून 50 कोटींची रक्‍कम प्राप्त झाली आहे. पाइपलाइनचे काम सोरेगाव येथून पाकणीपर्यंत सुरू आहे. वरवडेजवळही काम सुरू करण्यात आले असून भीमा नदीत पंपहाउस बसविण्याचे काम लवकरच सुरू होईल. मात्र, समांतर जलवाहिनीसाठी विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याने काम पूर्ण होण्यास वाढीव आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी चर्चा आहे. 

दरम्यान, तीन तालुक्‍यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचा काही भाग संपादित करावा लागणार असून त्यावर 90 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यावर सुनावणी घेऊन त्यांच्या मोबदल्याची निश्‍चिती करून तो प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल. नियोजित कालावधीत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचेही स्मार्ट सिटीचे अभियंता संजय धनशेट्टी यांनी या वेळी सांगितले. 

तीन तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा अडकला मोबदला 
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बसवेश्‍वर नगर आणि देगाव येथील प्रत्येकी दोन, मोहोळ तालुक्‍यातील खंडाळी व शेटफळ येथील प्रत्येकी एक आणि माढा तालुक्‍यातील आढेगावचे पाच, अकुंभेतील सहा, अरणमधील 29, भोईंजेतील सहा, मोडनिंबचे 11, सापटणे (टे) मधील 13, वरवडे येथील 15 आणि वेणेगाव येथील 14 शेतकऱ्यांच्या शेतातून ही समांतर जलवाहिनी जाणार आहे. त्यासाठी त्यांची जमीन संपादित करावी लागणार असून काहींच्या जमिनीतील झाडे, घरेही बाधित होणार आहेत. त्याचे मूल्यांकन कृषी विभागाने करून महापालिकेला त्याचा रिपोर्ट दिला आहे. मात्र, 90 शेतकऱ्यांनी हरकती घेतल्यानंतर पुढील कार्यवाही थांबल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हरकतींवर सुनावणी होऊन त्यांना द्यावयाचा मोबदला निश्‍चित केला जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल