
केत्तूर (सोलापूर) : सोलापूर-पुणेसह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणात 112 टक्के पाणीसाठा (117 टीएमसी) झाल्याने उजनी बॅकवॉटर परिसर पाण्याने भरून गेला आहे. आता जलसंपदा खात्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये, म्हणून आतापासूनच पाणी नियोजन करण्याची मागणी करमाळा तालुक्याच्या बॅकवॉटरमधील शेतकऱ्यांतून होत आहे. या पाण्याचा लाभ घेणाऱ्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवून नियोजन करावे, असे शेतकऱ्यांची मत आहे.
गतवर्षीही उजनी धरण 100 टक्के भरले होते. परंतु, पाण्याच्या अनागोंदी नियोजन, राजकीय हस्तक्षेप यामुळे गतवर्षी पाणी नाही. परंतु त्याच्या अगोदरच्या वर्षी करमाळा, कर्जत, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी फजिती झाली होती. शिवाय, मानसिक त्रास तसेच आर्थिक फटकाही बसला होता.
सोलापूरला धरणातून पाणी पिण्यासाठी नदी व कालव्यातून पाणी सोडणे म्हणजे 'उचकीपेक्षा गुळणीच मोठी' असा प्रकार होत आहे. पिण्याच्या पाण्याला कोणालाही विरोध नाही, परंतु पिण्यासाठी म्हणून नदीतून पाणी सोडले जात असल्याने पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोलापूरला बंद पाईपलाईन मधूनच पाणी देण्यात यावे, याशिवाय पाणी देऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.
उजनी धरण हे जायकवाडी, कोयनानंतर सर्वात मोठे धरण आहे. या धरणाचा पाणी साठवण क्षमता 3320, उपयुक्त साठवण क्षमता 1517.19 व मृत साठवणक्षमता 1802.81 दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणी साठवण क्षमता 53.57 टीएमसी, मृतसाठा 63.65 टीएमसी असा मोठा असलेले उजनी धरण हे राज्यातील एकमेव धोरण आहे.
केत्तूर येथील शेतकरी उदयसिंह मोरे पाटील म्हणाले, उजनी बॅकवॉटर क्षेत्रात उजनी जलाशयात 100 % चेवर (112 %) पाणीसाठा झाल्याने आनंदाचे वातावरण असले तरी, केवळ नियोजनाअभावी उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आता तरी येऊ देऊ नये.
केत्तूर येथील शेतकरी अशोक पाटील म्हणाले, उजनी धरण निर्मितीसाठी ज्यांची घरेदारे, जमिनी गेल्या त्यांना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात संघर्ष करावा लागतो आहे. हेच मोठे दुर्दैव आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.